१.
मोह मायेने भुलवले
लोक मग लाचार जगले
साखळी नव्हती तरीही
बंधनाने मी जखडले
घात केला पारध्याने
सावजाचे प्राण सुटले
सावकारी कर्ज फिटले
चक्रवाढी व्याज उरले
टाळली नाही व्यथा पण
अंतरी सुख दीन दिसले
वादळे आली नि गेली
कस्पटांसम मी चिकटले
शोधताना देव येथे
चक्र लावत पाय फिरले
सोडले जेव्हा सुखाने
प्रेम तारक मंत्र शिकले
डाव रचला वेदनांनी
मी मनाने पूर्ण खचले
२.
सदैव मागे वळून बघ
वर्तमान तू जगून बघ
अनाकलनीय आहे जग
आनंदाने हसून बघ
शब्द जरी हा कडवटसा
गोड मानुनी गिळून बघ
दुःख आतले सांग सखे
काळजात सुख भरून बघ
राम नाम घे सदा मुखी
शुद्ध मनाला करून बघ
साधी-साधी म्हणतो तो
छान एकदा नटून बघ
कामांमध्ये सतत कशी?
घरात राणी बनून बघ
३.
वादळाशी लता नेहमी भांडते
फूल गळते तरी ठाम ती राहते
मी मनाला सदा सांगते शांत हो
मन तळाशी उसळती व्यथा दाबते
मानसन्मान जपते मनापासुनी
स्री घराचा खरा तोल सांभाळते
दैव रुसले जरी ठाम ती राहते
निग्रहाने परत स्री उभी ठाकते
सोसला भर उन्हाळा कुटुंबातला
सावलीने सख्याच्या मनी हासते
आसवांशी जरी घट्ट नाते तिचे
स्री सहनशीलतेची परी वाटते
मोकळे सोडले श्वापदाला तरी
भूक मिटल्यावरी ना झडप घालते
.............................................

No comments:
Post a Comment