तीन गझला : निलोफर फणीबंद शेख

 




१.


आत सारे कोंडताही येत नाही

बाहुलीला बोलताही येत नाही


का तुला काठावरी नेऊ मनाच्या 

जर तुला तळ गाठताही येत नाही


फक्त तडफडणे अनामिक राहते अन् 

पिंजऱ्यातुन सोडताही येत नाही


वाटते तेंव्हा कुणी येतो नि जातो 

दार आतुन लावताही येत नाही


याचसाठी राहिली पत्रे तुझी ती 

वाटते, पण जाळताही येत नाही


आतले उद्ध्वस्त असले गाव जर का 

झाड कुठले लावताही येत नाही


मी मुलीला पिंजरा देऊ कसा, अन् 

ती सुरक्षित ठेवताही येत नाही 


२.


माणुसकीची चादर जर का कुठे फाटली नसती 

नावामध्ये जात कुणाची कधीच दिसली नसती


इतिहास मानले असते मी डोळे झाकुन तेंव्हा 

इतिहासाची पाने जर का कुणी बदलली नसती


राजकारणापुढे लोकशाही हरताना दिसते 

नाहीतर नेत्यांची टोळी कधीच फुटली नसती 


जिंदगी तुझ्या उन्हात पुरता जळून गेला असता 

जर का डोक्यावर आईची एक सावली नसती


दुनिया जगते आशेवरती हे जर खोटे असते 

तुला भेटण्याची इच्छा मग मीच ठेवली नसती


आपण देतो खतपाणी त्यावर ही सत्ता जगते 

नाहीतर देशात कुणीही जात पेरली नसती


३.


हसण्यावरती रडण्यावरती काय लिहू मी ?

जीवनभरच्या पळण्यावरती काय लिहू मी ?


किनारा हवा प्रत्येकाला हक्काचा  अन् 

तेच नेमके नसण्यावरती काय लिहू मी ?


तारे कुठले इच्छा होत्या जखमा बांधुन 

जखमांच्या त्या तुटण्यावरती काय लिहू मी ?


संपत्ती, पद, अवघी दुनिया अरे जिंकले 

स्वतःशीच पण हरण्यावरती काय लिहू मी ?


खुर्ची त्यांची, दंगल अपुली, अजब खेळ हा 

दिशाहीन या लढण्यावरती काय लिहू मी ?

..............................................

No comments:

Post a Comment