दोन गझला : विद्यानंद विश्वेश्वर हाडके




१.


बहरत गेलो हो केल्याने

कसे जगावे 'नो' केल्याने


गोडे पाणी झाले खारे

समंदराशी दो केल्याने


ओठांवरती हास्य उमलते

तू नजरेने हो केल्याने


रांग लागते अवतीभवती

श्रीमंतीचा शो केल्याने


घाबरून मग हसेल खुदकन

बघ दुःखाला भो केल्याने


गांधी कोठे ठार जाहले

नत्थुरामच्या ठो केल्याने


२.


सांगा किती करावा जोहार माणसांनी

झटकून राख, व्हावे अंगार माणसांनी


गद्दार माणसांनी छातीत वार केले

बस एवढेच केले उपकार माणसांनी


सारी गळून पडली शस्त्रे युगायुगाची

करताच लेखणीला तलवार माणसांनी


युद्धाशिवाय केले जगणे पसंत तेव्हा

केलेत माणसांचे सत्कार माणसांनी


खणकावुनी अता जर खुर्दाच बोलतो तर

झोपेतुनी उठावे कलदार माणसांनी


आदर्श जीवनाचे सारेच व्यर्थ ठरले

स्वीकारता ठगांचे सरकार माणसांनी


ही वेळ योग्य आहे मैदान मारण्याची

आता खरा करावा एल्गार माणसांनी

............................................

No comments:

Post a Comment