तीन गझला : जयराम धोंगडे




१.


जे होते दुःख मला ते, ना कधी सांगता आले

तू असून सोबत कायम, ना तुला ताडता आले


मी रमलो आता शहरी, रक्तात गावपण माझ्या

संस्कार गावचे काही, ना मला सोडता आले


पाहून कोडगी दुनिया, वैषम्य वाटले केवळ

ना चिडता आले त्यावर, ना कधी उसळता आले


दुःखाच्या वाटेवरती, सुख लपून बसले होते 

मी धडपडलो पण त्याला ना कधी शोधता आले


विचारात असतो माझ्या बस माणूस केंद्रस्थानी

गझलेत विषय बाकीचे ना मला मांडता आले


२.


जाहिरातीच्या छळाला 

लागला मासा गळाला


नाव झंझावात माझे

का भिऊ मी वादळाला?


जे नको त्याचीच चर्चा

हेच कारण गोंधळाला


कर्म जे करशील ते ते

परतुनी येते फळाला


जेवढी केली प्रशंसा

तेवढा मतलब कळाला


३.


तसा कुणाला थांग मनाचा लागत नाही

वढाळ झाले की मन सहसा लाजत नाही


घोटभराने नशा यायची सुरुवातीला

अता रिचवतो किती तरीही भागत नाही


मलम कुठे ? ते मीठ चोळती गोड बोलुनी

जखम असो की सल मी कोणा सांगत नाही


आली आहे मंदी बहुधा मैत्रीमध्ये

लळा तेवढा कुणी कुणाला लावत नाही


पाणीबाणी आली सूर्या किती तापतो

फक्त हुंदके देतो, आसू गाळत नाही

.............…............................

जयराम धोंगडे, नांदेड 

मो. ९४२२५५३३६९

No comments:

Post a Comment