१.
नाही नाही म्हणता सगळे कष्ट उपसतो मी
कष्टाचे हे जीवन माझे सदैव जगतो मी
कायम वाटे गुपीत माझे केव्हा सांगू मी
प्रेम तुझ्यावर निर्मळ करुनी तुझ्यात रमतो मी
ध्यान लावुनी चिंतन करतो सुख-शांतीला मी
संसाराच्या चक्रामध्ये रोजच फिरतो मी
आठवणी त्या मनात येता मन हे बावरते
आनंदाने या दु:खाने हसतो रडतो मी
संस्कारांचा अमूल्य ठेवा मला लाभला की
आईबाबा दैवत माझे जगी मानतो मी.
२.
सत्य सांगायची वेळ आली खरी
मौन सोडायची वेळ आली खरी
मित्र वैरी कसा जाहला आपला
गूढ शोधायची वेळ आली खरी
खूप झाले तुझे नाटकी वागणे
स्पष्ट बोलायची वेळ आली खरी
कोठवर कष्ट मी सांग सोसायचे!
स्वस्थ राहायची वेळ आली खरी
जास्त शेफारला पोरगा वाटतो
शिस्त लावायची वेळ आली खरी
काय बोलायचे काय बोलू नये
शब्द तोलायची वेळ आली खरी
जिद्द जोपासली शिक्षणाची जरी
डाव जिंकायची वेळ आली खरी.
३.
आयुष्याला संघर्षाशी लढणे होते
शांत मनाने प्रत्येकाशी जुळणे होते
आधाराची काठी नव्हती जीवनामधे
पण दैवावर ना केव्हाही रुसणे होते
आपुलकीने भाकर-तुकडा खाल्ला होता
चेहऱ्यावरी अर्ध्यापोटी हसणे होते
नियतीचाही खेळ विलक्षण पाहिला खरा
वेळो-वेळी उपकारांचे मिळणे होते
झळ कष्टांची बोचत होती अनेक वेळा
दुःख तयाचे ना दुसऱ्याला कळणे होते
हाल-अपेष्टा खूप काढुनी शिक्षण झाले
यश मिळल्यावर अभिमानाचे जगणे होते
बालपणाचा काळ सुखाचा असतो म्हणती
पण 'शोभा' का नशिबामध्ये कसणे होते.
............................................
No comments:
Post a Comment