तीन गझला : डॉ. राज रणधीर





१.


रित्या घरट्यात हल्ली राहवत नाही

कुठे जातात जाणारे? कळत नाही


'दही साखर तरी घे थांब निघताना'

मला आई अता का थांबवत नाही?


विलंबाने जरी आलो घरी माझ्या

मला कोणीच का कारण पुसत नाही


बरड वर्षानुवर्षे ही धरा इथली

इथे माणूसकीचे बी रुजत नाही


किती निष्ठूर झाली माणसे हल्ली 

कुण्या जातीमधे शांती दिसत नाही


तिरंगी ध्वज असावा फक्त नावाला 

तुझे स्वातंत्र्य रंगांना पुरत नाही


शपथ भगवद्गितेची घेतली जाते 

अरे पण सत्य इतक्याने ठरत नाही


२.


म्हणावयाला जगलो आपण

कुठे कुणाला कळलो आपण


कर्तृत्वाने तारा झालो 

इच्छेने कोसळलो आपण 


हळव्या काचा झालो होतो 

कुजके होतो तुटलो आपण


क्षणभर सोबत जगलो होतो 

नंतर केवळ रडलो आपण


जिथे सावरायाचे होते 

तिथे नेमके पडलो आपण


क्षणाक्षणाला दु:ख मिळाले 

दाखवायला हसलो आपण


हृदय आपले हळवे होते 

सहज त्यामुळे फसलो आपण


खोटे काही खरे असू दे 

अपुल्यापुरते उरलो आपण


उंबरठा ही हरला जेथे 

त्या शहरातच शिकलो आपण


३.


मी कवितेचे जीर्ण पान जे पुन्हा उलटले होते

शब्द अचानक जिवंत होउन फार बोलले होते


मायेने तळहात फिरवुनी दूर धूळ मी केली 

वहीतले मग गंधित अक्षर पुन्हा बहरले होते


मिटवुन डोळे मी शब्दांना पुन्हा बिलगलो अंती

शब्दांतुन या नाजुक काही अर्थ निसटले होते


कवितेतुन मी तुला वाचले एक शिरशिरी आली 

आभाळाने रंग उधळले चित्र काढले होते


कुठून आला वारा त्याने घरभर पाने केली 

वाऱ्याला कवितेतुन माझ्या मीच वगळले होते


काळाच्या हातातुन अस्सल कथा हरवली होती 

काळासोबत चालत जाणे मीच निवडले होते


सैरावैरा दिशाहीन मी धावत सुटलो होतो 

काळाने तळपायाखाली स्वप्न तुडवले होते


डोळ्यांमध्ये डोहाच्या प्रतिबिंब तुझे दिसले अन्

डोळ्यांमध्ये मी डोहाच्या प्राण त्यागले होते

................................…...........

No comments:

Post a Comment