तीन गझला : कविता पुणतांबेकर

 




१.


बाण शब्दांचे असे जे सोडले होते 

झेलताना अर्थ त्याचे बोचले होते 


स्वप्न माझे फार मोठे ना दिसे कोणा 

रंक मी म्हणुनीच त्याला कोंडले होते 


बांधली मी घर-दुकाने ज्या मुलासाठी 

आज त्याने घर विदेशी थाटले होते 


जीवनाचे चित्र जे रेखाटले आम्ही 

रंगल्याविण आज तेही फाटले होते 


खूप शिकण्याची धडाडी अंतरी होती

लेक म्हणुनी पंख माझे छाटले होते 


आसवांचे कोण आता लाड करण्याला? 

हे समजता अंतरातच दाटले होते 


पावसाने आसवेही वाहुनी नेली 

दुःख माझे आज ऐसे झाकले होते 


२.


आभाळ फाटलेले जोडायचे कसे मी? 

तेथे ठिगळ कितीदा लावायचे कसे मी? 


बोलून टाकण्याची इच्छा मनात आहे 

ऐकायचे न त्यांना सांगायचे कसे मी?


सोडून हात माझा आई नि बाप गेले

हे दुःख प्राक्तनाचे भोगायचे कसे मी?


काळा मला दिल्या तू जखमा किती विखारी 

हे घाव एकटीने सोसायचे कसे मी? 


वैरीण रात्र झाली डोळ्यांत झोप नाही 

गोंजारले कुणी ना झोपायचे कसे मी? 


३.


वीज कडकली शिवार जळले कळले नाही 

कौलारू घर ऋणात फसले कळले नाही 


तुझे बोलणे आषाढाचे थेंब वाटले 

दुःखाचे कढ उतून पडले कळले नाही 


सुंदर दिसला मला गालिचा मोहित झालो 

पाण्यावरती तवंग जमले कळले नाही 


भाग्य असे का रंग बदलते आयुष्याचे 

नेत्याचे पद काल उलटले कळले नाही 


लाही लाही सूर्य तळपला माथ्यावरती 

त्यावर श्रावण मेघ बरसले कळले नाही

.............….............................

कविता पुणतांबेकर 'कुमुद', शाजापूर, मध्य प्रदेश

No comments:

Post a Comment