तीन गझला : हेमंत राजाराम

  




१.


जन्मल्यापासूनचा संबंध मातीचा

सांग ना सोडू कसा या संग मातीचा 


मळवले सर्वांग जेव्हा धूळमातीने

लागला शब्दांस तेव्हा रंग मातीचा


ऐक ना करतो जरी शेती फुलांची मी 

या जिवाला वेड लावी गंध मातीचा  


रांगलो, पडलो पुन्हा मातीतुनी उठलो

केवढा जडला मला हा छंद मातीचा 


ढाळतो जमिनीत जेव्हा घाम निढळाचा 

मग पिकांतुन डोलतो आनंद मातीचा


२.


खूपच गेले पुलाखालुनी वाहुन पाणी 

पूल राहिला स्तब्ध एकटक पाहुन पाणी 


कसे जायचे तुला एकटे इथे सोडूनी

पाहिलेस जर डोळ्यांमध्ये आणुन पाणी 


पक्षी, हत्ती, हरिणी, चित्ते साऱ्यांसाठी

तळे ठेवते निवळशंख सांभाळुन पाणी 


खूप धावलो ज्यासाठी ते मृगजळ होते

तहानलेली इच्छा जगवा पाजुन पाणी


पाण्यावाचुन तडफडलेला जीव जन्मभर

तिलांजली द्या डोळ्यांमधले काढुन पाणी 


३.


जीव एवढा लावायाला 

तुला कुणी सांगितले होते

जन्म कुणावर उधळायाला 

तुला कुणी सांगितले होते


विचार सुंदर तुला वाटला

पण इतरांना पटला नाही

व्यर्थ अपेक्षा ठेवायाला

तुला कुणी सांगितले होते


ओघळलेना अश्रू गाली,

भळभळलीना जखम पुराणी

जीर्ण डायरी चाळायाला

तुला कुणी सांगितले होते


सवयच नाही दुखवायाची

तरी बोलशी शब्द जिव्हारी

असे विखारी बोलायाला

तुला कुणी सांगितले होते


खूप देखणा दिसला तरिही

तुझ्या नशीबी नसणाऱ्या त्या

चंद्रावरती भाळायाला

तुला कुणी सांगितले होते


अंधाराचे भय असल्यावर

उजेडात जाणे सोयीचे

झडप दिव्यावर घालायाला

तुला कुणी सांगितले होते

.......…...................................

No comments:

Post a Comment