गझलसम्राट सुरेश भट यांच्या काव्यात संत आणि त्यांच्या जीवनाचा वारंवार उल्लेख केलेला आढळतो. कधी तो अतिशय आपुलकीयुक्त असतो तर कधी रागावून, संतापून सुद्धा केलेला आढळतो. पण संत परिवाराशी सुरेश भटांचे नाते अतिशय सुंदर आणि लोभसवाणे आहे. त्यात विलक्षण प्रेम आहे, आत्मीयता आहे, त्यामुळेच ते संतांचा उल्लेख एकेरी शब्दात करतात. जसे की तुका, ज्ञानया, नामा, जनाई इत्यादी. पण ते कधीही अपमानास्पद किंवा आक्षेपार्ह वाटत नाही.
उदाहरणच द्यायचे झाल्यास त्यांची “एवढे दे पांडुरंगा” ही कविता बघावी. भक्तिरसाने ओतप्रोत अशी ही कविता म्हणजे एखाद्या भाविक वारकऱ्याने पांडुरंगाला घातलेली आळवणीच आहे.
स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षात व्हावी
इंद्रियांवाचून मी ही इंद्रिये भोगून घ्यावी
त्या ज्ञानचक्षू ज्ञानेश्वरांनी माझ्या हृदयात प्रकट व्हावे. त्यामुळे या चराचराचे दिव्य ज्ञान मलाही प्राप्त व्हावे. किती सुंदर कल्पना आहे ही ! पुढे हीच कल्पना सुरेश भट फुलवीत नेतात.
एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला
नामया हाती बनावे हे जिणे गोपाळकाला
संत एकनाथ, नामदेव यांच्या पंगतीचा मला लाभ मिळावा आणि साक्षात जनाबाईंच्या सोबत जाते दळण्याचा मान मला मिळावा.
माझियासाठी जगाचे रोज जाते घरघरावे
मात्र मी सोशेल जे जे ते जनाईचे असावे
तुकोबांबद्दल लिहिताना तर त्यांची लेखणी अधिकच भक्तिभावपूर्ण होते.
मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे
चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे
तुकोबांसारखे दुसऱ्यांसाठी माझे अश्रू झरावेत आणि त्यांच्याच प्रमाणे स्वतःला वाटून देण्याइतकी दानत मला मिळावी.
ह्याविणा काही नको रे, एवढे दे पांडुरंगा
ह्याचसाठी मांडीला हा, मी तुझ्या दारात दंगा !
हे ईश्वरा, या व्यतिरिक्त मला काहीच नको. या संत मंडळींचे थोडे जरी गुण माझ्यात आले तरी माझ्या आयुष्याचे सार्थक होईल आणि त्यासाठीच तुझ्या दारात मी धरणे धरतो आहे.
मराठीमध्ये इतकी भक्तिभावपूर्ण, श्रद्धेने रसरसलेली कविता अभावानेच लिहिल्या गेली असेल. पण भटांच्या कवितेत संतांबद्दलचे हे प्रेम, हा भक्तिभाव नेहमीच आढळतो. एकंदरीत त्यांच्या कवितेचा बाज -
माझिया गीतात वेडे, दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या, अमृताचे फूल यावे
असा असतो. कधी त्यांच्या लेखणीत वारकऱ्यांचा आवेश उतरतो आणि ते लिहून जातात -
कुणाही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
जिथे नाचे विठू झेंडा तिथे हा रोवतो आम्ही
पण कधी कधी त्यांची लेखणी जेव्हा विद्रोहाचे रूप धारण करते मग तिला एक वेगळीच धार चढते.
मठोमठी मंबाजींना करू द्या कीर्तने
विठू काय बेइमानांना पावणार आहे
नेहमी संतांबद्दल इतक्या प्रेमाने लिहिणारे सुरेश भट कधी उग्ररूप धारण करतात ते आपल्याला कळतही नाही.
तेव्हा सदेह स्वर्गी गेला जरी तुका
येथील भाविकांना भंडावतात भुका
ही लूट, हे खून, हे दरोडे
हे देवते, फोटो तुझा का मुका
सुरेश भट असे लिहितात तेव्हा खरोखरच आश्चर्य वाटतं. कुठून आली असेल ही वेदना, हे दुःख त्यांच्या लेखणीत?
म्हणूनच ते लिहितात -
शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला, गोठ्यातच जगला हेला
रेड्याला वेदमंत्र म्हणायला लावले म्हणून ज्ञानदेव प्रसिद्ध झालेत, पण ज्या रेड्याने वेदमंत्र म्हटलेत तो मात्र आयुष्यभर उपेक्षितच राहिला. असा या ओळींचा आशय आहे. बारकाईने बघितले तर दुसऱ्या ओळीत “हेला” हा अप्रचलित शब्द, मशहूर हा उर्दू शब्द आणि ज्ञानया हा ज्ञानदेवांचा आपुलकीपूर्ण उल्लेख एकाच ओळीत सुरेश भट साधतात. हे असे शिवधनुष्य केवळ तेच उचलू जाणे !
सुरेश भटांचा हा विद्रोह पुढे इतका वाढतो की साक्षात विठ्ठलाला जाब विचारायला ते घाबरत नाहीत.
ऐकले पाल्हाळ मी रामायणाचे
शम्बुकाची गोष्ट पाल्हाळिक नाही
काळजी नाही मला त्या विठ्ठलाची
संतहो मी तेवढा भाविक नाही
विठ्ठलाला नेहमी बोल लावणाऱ्या तुकोबारायांची अवस्था तरी यापेक्षा काय वेगळी होती? आत्यंतिक प्रेमातूनच हा आत्यंतिक राग निर्माण होतो.
सुरेश भटांचा हा विद्रोह पुढे इतका प्रखर होतो की आणि इतके उग्र रूप धारण करतो की त्याची धग सहन करणे अशक्य होऊन जाते.
संतहो आम्ही जरी हे जन्मण्याचे पाप केले
लागली नाही आम्हाला लूत रोगी ईश्वराची
संतांना उद्देशून त्यांनी केलेले हे भाष्य म्हणजे त्यांच्या संतांबद्दलच्या प्रेमाचीच ग्वाही देते. काहीही असो भटांचा संतांसोबतचा हा संवाद विलक्षण लोभसवाणा वाटतो. कधी आत्यंतिक प्रेम तर आत्यंतिक राग ही सगळी भटांच्या मनस्वी स्वभावाची वैशिष्ट्ये त्यांच्या काव्यातही दिसतात. आपण रसिकांनी या भक्तिरसात बुडून जाऊन त्याचा आस्वाद घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यांचा रागही मग सुखकर वाटतो.
म्हणूनच त्यांच्या लेखनाचे सार त्यांच्याच पुढच्या ओळींमध्ये आहे असे वाटते.
साधीसुधी ही माणसे
माझिया कवित्वाची धनी
यांच्यात मी पाहतो तुका
यांच्यात मी पाहतो जनी !
.....................….....................
अविनाश चिंचवडकर
मो. ९९८६१९६९४०

खूपच सुंदर लेख , फारच आवडला , सुरेश भटांनी साधू संतावर फारच छान शेर लिहिले आहेत, जे मी कधीच वाचले नव्हते तेही वाचायला मिळाले मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ReplyDelete