१.
डोळे मिटुनी अंधाराशी खेळत गेले
उजेड झाला दारे खिडक्या उघडत गेले
एकानंतर एक कुलूपे दिसली जेव्हा
व्यवहाराचा बोध जीवनी उमजत गेले
आभाळाभर झेप घेतली तिने कदाचित
दगडांवरती भार नदीचे वाहत गेले
विश्वासाने एक पायरी चढले मीही
कष्टांचे मग नाव सुखाशी जोडत गेले
उपन्यास मी वाचत होते आतुरतेने
मुक प्राण्यांचे शब्द उराशी लागत गेले
२.
दगडास छान दिधले आकार या धरेने
दगडात देव दिसले केवळ तिच्या कृपेने
साठा हवा सुखाचा आयुष्यभर पुरेसा
दुःखास भोगताना घ्यावे जरा कलेने
*शब्दात बांधलेल्या गोडास अर्थ नाही*
*कडवटपणा उराचा जर चाखला जिभेने*
डोहात तुंबलेल्या पाण्यास जाण नाही
पाण्यात दोन अश्रू जर गाळले हवेने
तपते उन्हात केवळ निर्जीव सावली ती
डोळे मिटून तीही जाते तिच्या दिशेने
३.
श्वास थांबून गेले तुला बघता क्षणी
काय उसवून गेले तुला बघता क्षणी
बाण सारे उराशीच येऊ लागले
भान हरपून गेले तुला बघता क्षणी
कोपराही मनाचा नसे फुलला असा
साद देऊन गेले तुला बघता क्षणी
आरसे दोन तू लावले माझ्याकडे
त्यात गुंतून गेले तुला बघता क्षणी
खोल दाटून आली नभाची वादळी
भाव निसटून गेले तुला बघता क्षणी
...............................
सौ. दिपाली महेश वझे, बेंगळूरू
मो. 9714393969
No comments:
Post a Comment