तीन गझला : सायली कुलकर्णी

 



१.


घाव मनाने किती झेलले नका विचारू

दु:ख अंतरी किती गाडले नका विचारू


रचून खोटे सोंग कमवला काळा पैसा

खिसे कुणाचे किती तुंबले नका विचारू


वारस मिळण्यासाठी खुडले कळीस छोट्या

अर्भक इवले कुणी मारले नका विचारू


क्षणिक सुखाच्या मोहासाठी लुटली इज्जत

बाल्य कोवळे किती करपले नका विचारू 


स्वतंत्र केला देश धाडसी छाताडांनी

रक्त धरेवर किती सांडले नका विचारू


ती जेव्हाही दुर्बलतेशी लढली होती

सगेसोयरे कसे वागले नका विचारू


अठराविश्वे दारिद्र्याने शिणून गेले

अब्रूला मी कसे झाकले नका विचारू


२.


बोलणे यांचे जरी दमदार आहे

दीन अन् लाचार हे सरकार आहे


भासते कमजोर देहाने जरी मी

लेखणीला बोचणारी धार आहे


कोवळे दिसते जरी ते फूल सुंदर

त्या फुलाला पाकळ्यांचा भार आहे


रूप आहे ठेंगणे सामान्य जरीही

शब्द त्यांचा रांगडी तलवार आहे


भेटला ना न्याय केले अर्ज लाखो

वंचितांचा कोणता दरबार आहे? 


खंत नाही तोडताना बंध हळवे

भावनांचा चालला व्यापार आहे


लोळते सुख पावलांशी पण तरीही

लालसेने ग्रासला संसार आहे


३.


वाटेवर त्या उगा भटकणे नकोच आता

डोळ्यांत पुन्हा तुझ्या हरवणे नकोच आता


असा पोळलो प्रेमाच्या वणव्यात  तुझ्या मी

बटांत कुरळ्या जीव गुंतणे नकोच आता


सुरा खुपसला आप्तांनीही पाठीमध्ये

कोणावर विश्वास ठेवणे नकोच आता


बगल सुखाने मला दिलेली कायम आहे

स्वप्न सुखाचे नवे पाहणे नकोच आता


प्रश्नांच्या गुंत्यात अशी मी अडकत गेले

प्रश्नांची त्या उकल शोधणे नकोच आता


झाले गेले विसरून जरा जगेन म्हणते

आठवांत त्या पुन:श्च झुरणे नकोच आता


सामर्थ्याने घ्यावी गगनी उंच भरारी

परावलंबी भेकड जगणे नकोच आता

........…...................................

No comments:

Post a Comment