तीन गझला : सौ. रेखा तांबे

 




१.


पूजेसाठी फुलांबरोबर तुळशीची पण जरूर असते, 

सौंदर्यांला सुद्धा अशीच सोज्वळतेची जोड शोभते


दृष्ट कुणाची हवी कशाला म्हणून असते तीट काजळी,

कृष्णरंगात एक आगळे सौंदर्य मला मग जाणवते


आजकालच्या सिनेमांमधे उच्छृंखलता किती असावी,

नैतिकतेच्या मूल्यांची का त्यांना तितकी चाडच नसते ?


जीवनातील चक्रव्यूहात प्रत्येकाला फसणे आहे

सूर्य अन् चंद्र, दोघांनाही नशिबाने तर  ग्रहण लागते


राजकारणी समानतेची रोज गातात गाणी येथे

पण जनतेला सत्यात कधी  मिळणार हक्क हे न समजते


२.


कशाकशातच लागत नाही मन आता

वार्धक्याच्या खुणा पचवते तन आता


खूपच होते वेड मनाला भिजायचे

पण चिंब करत नाही हल्ली घन आता


जाणिव होती नात्यांमध्ये कधीतरी 

ऊब हरवती नात्यांमधली जन आता 


घाव घातले वृक्षांवरती मनुजाने 

वन्य जीव पण शोधत फिरती वन आता


अमाप पैसा जमवलास तू  जीवनभर

सरणावरती कसे न्यायचे धन आता


३.


हृदयात सख्या सतत होतास

विश्वासघात तरी केलास


कुंठित झाली का तुझी मती

भाव मनाचे तू विसरलास


जीव लावून मिळाले काय

कधी वाटतो स्वतःचा ऱ्हास


करते जेव्हा स्त्री खरे प्रेम,

अडकतो तिचा प्रेमात श्वास


इतके करते प्रेम तुझ्यावर 

चुकलास जरी मज तू हवास


कधी वेळ जर मिळाला तुला

घेशील परत  माझाच ध्यास


माझ्याशिवाय जगणे अशक्य 

असे तर तूच बोलायचास


प्रेमात खूप असते ताकद

सहजगत्या मी भोगेन त्रास


सोडून मला कुठे जाशील

येशील परत अजुनही आस

..............................................

No comments:

Post a Comment