१.
खूप मनाने अवखळ आहे
आत चंदनी परिमळ आहे
येण्याचे तो विसरुन गेला
उंबऱ्यावरी ओघळ आहे
ठिबकत गेले रुदन कदाचित
म्हणुन कोरडे जलतळ आहे
डोळ्यांमधली ओल हरवली
ओला पान्हा आचळ आहे
जोडत जाऊ कुडी मनाची
मानवतेची साकळ आहे
नसेल काही पांघरायला
कूस मायची वाकळ आहे
नकोस शोधू गंध कुणाचा
तुझी सुगंधी बाभळ आहे!
आई त्याची घरी असावी
कानामागे काजळ आहे!
२.
आतली इच्छा अघोरी वाटते
जिंदगी झाली लगोरी वाटते
फार मोठ्याने नको बोलू मुली
बोलली तर ती मुजोरी वाटते
भोगलेला काळ जेव्हा वाचते
आतली पाटीच कोरी वाटते
बांधते साऱ्या घराला एकटी
संयमाची माय दोरी वाटते
ती व्यथेचीही प्रथा सांभाळते
मन तिचे तितके बिलोरी वाटते
३.
सुखाच्या आत दुःखाची व्यथाही सापडू शकते
तळाशी शांत डोहाच्या घडीही विस्कटू शकते
नभी दाटून आलेल्या उदासी चांदण्यासाठी
तुझ्या स्वप्नातली वेड्या दिशाही भरकटू शकते
हुशारी फार कोणाशी कधी केव्हाच केली ना
अशा साधेपणाने तर तुझे जग फरफटू शकते
नको सोडू इथे गाथा तुझ्या आतूर ध्येयाची
तुझ्या इच्छेतली आशा इथे केवळ बुडू शकते
कधी ऐकून मौनाला किती व्याकूळ झाले मन
मुक्या ओठातले सारे असेही उलगडू शकते
...............................................
No comments:
Post a Comment