दोन गझला : सुधीर कुबेर

 




१.


जाहला संपर्क क्षणभर बोलणेही राहिले

अंतरीचे गूज तुजसी सांगणेही राहिले


जे नको ते छापलेले पान हाती घेतले

त्यामुळे मग आवडीचे वाचणेही राहिले


ती सुई अन् जाड दोरा हरवला कोठेतरी

फाटक्या ह्या जिंदगीला सांधणेही राहिले


नृत्यनीपुण नर्तिकेचा नाच जेव्हा संपला

थकुन गेल्या घुंगरांचे नादणेही राहिले


भोवती कोत्या मनांच्या माणसांचा राबता

त्या तिथे मग मुक्ततेने वागणेही राहिले


दाविला जो मार्ग अपुल्या पूर्वजांनी चांगला

त्यावरी का आज माझे चालणेही राहिले!


ये गडे तू भेटण्याला एकदा केव्हातरी

कैक जन्मांचे तुला ते भेटणेही राहिले!


२.


तव श्वासाने जगण्याचा मज लळा लावला होता

तो घाव आतला होता! गंभीर मामला होता!


सारेच ऋतू गिळणारी झोपडी लाभली

मजसी

आभाळा लावुन ठिगळे, संसार फाटला होता


मज न्याय मिळावा म्हणुनी किति कंठशोष मी केला

खोट्यांनी खरेपणाचा आवाज गाडला होता


जगण्याच्या काठावरची ती हिरवळ सारी सुकली

ओहळापरी झुळझुळता माणूस आटला होता


त्या उदास संध्याकाळी तू दाराजवळी येता

अंगणी तुझ्या छायेने अंधार उजळला होता!


ज्या झाडावरती घरटी बांधून पाखरे गेली

रस्त्याच्या विस्तारास्तव तो वृक्ष छाटला होता!


मी कधीच नव्हते म्हटले देवा, मज दर्शन दे तू

भक्तांच्या गर्दीने तो आधीच नाडला होता!

..............................................

No comments:

Post a Comment