तीन गझला : सौ.अर्चना रमेश मुरुगकर

   


१.


तिला वाटते तसे असावे त्यानेसुद्धा

वारा नसला तरी हलावी पानेसुद्धा


सोबत ठेका धरण्यासाठी कृष्ण दिसावा

चकीत व्हावे भाग्यावर भाग्यानेसुद्धा


स्वत:स गाडुन घेणे सोपे नसते बाई

अंकुरणाऱ्या 'बी'स बोलली रानेसुद्धा


अशी जिंक तू बुजवत रेषा दैवाच्या पण

स्वतः हरावे शरमेने दैवानेसुद्धा


वार्धक्याने हळू गळावे फुलाप्रमाणे 

सार्थक झाले सांगावे स्वर्गानेसुद्धा


फक्त मिराशी कुचकामाची ठरली आहे 

गाथा लिहिली प्रगतीची घामानेसुद्धा 


थांब अर्चना शब्द ऐक तू अनुभवातले  

दुनिया वळते थोड्याशा प्रेमानेसुद्धा



२.


असे अघोरी दान नको

पुतनेचे  स्तनपान नको


वेशीवरती थांब ढगा

धसमुसळे संधान नको


धांदल उडते कसे जगू

कसेनुसे अनुमान नको


भेट मिळावी सुंदरशी

गळ्यात भलते ध्यान नको


प्रेम करावे साऱ्यांनी

धाकापायी मान नको


स्वागत व्हावे गाण्याने

धुत्काराला श्वान नको


बिनकामाचे ज्ञान नको

पोकळ खोटी शान नको


३.


सुगंधात घरटे सजवतेस बाई

फुलासारखी रोज फुलतेस बाई


कथा होत मोठी प्रगटतेस बाई

नवे बीज पोटी रुजवतेस बाई


व्यथा सोसण्याची लपवतेस बाई

स्वतःला जगाला फसवतेस बाई


किती भूमिका तू वठवतेस बाई

खरी तारका तू झळकतेस बाई


विजेच्या प्रमाणे चमकतेस बाई

दिवा होत अंधार गिळतेस बाई

..........................................

सौ.अर्चना मुरुगकर

तळेगाव दाभाडे

No comments:

Post a Comment