तीन गझला : ज्योत्स्ना राजपूत

 




१.


मागणे नाहीच काही फक्त इतके कर 

धडपडू मी लागले तर हात माझा धर


सारखे डोळ्यांत पाणी येत असले जर 

सांग ना लपवू कुठे मी आसवांचे थर?


एवढी होतीच का रे चूक मोठी की 

सावली ना भेटली, आणिक उन्हातच घर 


फक्त खोट्या अभिनयावर चालते हे जग 

कोसळाया लागले मग भावनांचे दर 


तू मला विसरून जाणे योग्य आहे का ?

एकदा देऊन बघ ना आठवांवर भर


मी उन्हाळा सोसला अन् पावसाळाही

अंगभर ल्यालेच नाही श्रावणाची सर


२.


तुझे हे दुःख बाजूला जरा सारून तर बघ ना

सुखावर एकदा थोडे जरा भाळून तर बघ ना 


स्वतःसाठी तुझे हसणे स्वतःसाठीच रडणेही

कुणासाठी तुझे अश्रू कधी ढाळून तर बघ ना


अबोला केवढा आहे तुम्हा दोघांमधे हल्ली

तिच्या केसांत गजरा तू असा माळून तर बघ ना


तुझ्यावर भाळले होते तुझ्यावर प्रेमही आहे

जुनी ती प्रेमपत्रे तू अता चाळून तर बघ ना


असा प्रत्येक वळणावर कशाला थांबतो इतका

धिराने वळण एखादे कधी टाळून तर बघ ना


स्वतःचा जीव सर्वांना तसा प्याराच असतो पण

कुणावर एकदा हा जीव ओवाळून तर बघ ना


३.


नुसत्याच कल्पनांचे रचले किती मनोरे 

आयुष्यभर सुखाचे कागद तसेच कोरे 


नाती कुठे तशीही बांधून ठेवली तू 

उसवीत वीण गेला हातात फक्त दोरे 


ती बाहुली तुझी बघ पाहून वाट थकली 

ओलावले कितीदा डोळे तिचे टपोरे


दावून स्वप्न डोळ्यां झाले पसार नेते 

ही कोरडीच धरणे अन् कोरडेच खोरे


आता कुठे दिवाळी कुठला फराळ आता 

मोडीत सर्व विकले त्या कातण्या नि सोरे


मिळते पॅकिंग आता पाना, फुला, फळांचे 

कळणार काय त्यांना झाडावरील बोरे?

..............................................

No comments:

Post a Comment