तीन गझला : स्मिता गोरंटीवार

 




१.


जमवली राख अंगावर स्वतः होती निखाऱ्याने 

भडकला आणखी अग्नी पुन्हा बेभान वाऱ्याने


तुझ्या बेचैन होण्याचे मला कारण हवे आहे 

कळत नाही तुझी चिंता कुणाला येरझाऱ्याने 


सहन बापास का व्हावे तुझे जगणे असे मिंधे

कसे आयुष्य कष्टाने सफल केले बिचार्‍याने


निशाणा साधला होता शिकाऱ्याने क्षणार्धातच

जडवली पोवळी मोती जरी नव्हती पिसाऱ्याने 


किती आनंदले होते तुला खिडकीत बघताना 

पुन्हा बेभान झाले मन निखळत्या एक ताऱ्याने 


मुलींच्या भोवताली तर थवे निर्लज्ज चाळ्यांचे

पिढी सैराट झाली या नकोशा हातवाऱ्याने


खवळत्या सागरामध्ये शिडाची नाव भरकटली 

स्मिता, आरंभला होता फिरस्ता डाव वाऱ्याने 


२.


लागली तंद्री अगोदर

बोध झाला खूप नंतर


जन्मभर पोसून होते

मी अहं माझ्याबरोबर


वासना करते विसर्जित

पण तरी बसते उरावर 


लाट आली आणि गेली 

वाटले थांबेल क्षणभर


भेट त्यांची ना कधी पण

रात्र दिवसाची सहोदर


पाहिली स्वप्ने मनोहर 

हाय ती झालीत जर्जर


चालले उत्क्रांत होणे

कोण होते मी अगोदर


३.


चिंता नाही करत बुडबुडा अस्तित्वाची

अमर कुणीही नाही, खात्री आहे त्याची


अपंग करतो शिखर लीलया सर जिद्दीने

अव्यंगांना चिंता पडते गंतव्याची


परिस्थितीवर तुला पहारा ठेवायाचा

उंच पाहिजे अजून निर्धाराची माची


सिद्धीची तू सोड काळजी भगवंतावर

फक्त काळजी तुझ्या सतत घे संकल्पाची


सत्य ढळढळित असूनही ना दिसते त्याला

डोळ्यांवरती असते झापड सतत भ्रमाची


कफनी धारण केल्याने का फकीर होतो

टिंगल करते दुनिया असल्या वैराग्याची


वसंत आल्यावरती कोकिळ कूजन करतो

कुठे लागते त्यास शिकवणी गंधर्वाची

..….….....................................

No comments:

Post a Comment