तीन गझला : निशांत गुरू

 



१.


नाही कुठे मिळाला सहवास माणसाचा 

मग नाद सोडला मी माणूस शोधण्याचा


ओसाड गाव झाले शाळा उदास झाल्या 

आम्ही उठाव करतो मंदिर बांधण्याचा


जो भेटला मला तो सोडून दूर गेला 

नाही सराव माझा खोट्यास घोळण्याचा


वाचून चेहरा मी माणूस जाणतो पण 

फसतो बघुन गिलावा रंगीत चेहऱ्याचा


ओझ्यात दप्तराच्या ते बालपण हरपले 

केला विचार नाही त्या कोवळ्या वयाचा


हातात घेतल्यावर मी हात वादळाचा 

ढवळून टाकतो रे इतिहास या जगाचा


वणवाच पेटवा रे मिटवायचे मला जर 

नाही स्वभाव माझा ठिणगीस फुंकण्याचा


रक्तात साखरेची चाहुल मला मिळाली 

आहे तिच्या जिभेवर जर गोडवा मधाचा


गिळला जराजरासा या मतलबी जगाने 

खोलून ठेवल्यावर गर आतल्या उराचा


२.

 

कसलीच कमी नव्हती राजासमान होतो 

श्रीमंत किती होतो जेव्हा लहान होतो 


बला फाडली हरेक आपण मिळून दोघे 

बनली होतीस तीर तू , मी कमान होतो


कधी वाटले फुकट तर कधी उधार विकले 

मऊ, मखमली स्वप्नांचे मी दुकान होतो


कोवळ्या वयातही मी जुलुम भरडत होतो 

असाच तेव्हाही‌ विद्रोही तुफान होतो 


केलास दगा तू अन् म्हटले गद्दार मला 

तुझ्यासारखा मी कोठे बेइमान होतो 


पाने हिरवी सुकली पक्षी उडून गेले 

जीवनभर मी त्यांचे सुंदर मकान होतो 


जाता-जाता कळले रे पण वेळ निसटली 

केवढ्या चुका केल्या जेव्हा जवान होतो


३.


लेखणी तासली निडर झालो 

मी तुफानातली खबर झालो 


वेदनांचा थवा जरी डसतो 

झेलुनी वादळे कहर झालो 


आंधळी ती जरी दिसे सारे 

मी तिची आतली नजर झालो 


ओढणी जिन्स टॉप ना झालो 

फक्त मी मायचा पदर झालो 


झोपला का जुलूम पांघरुनी

जागवाया तुला गजर झालो 


संपले कैक जातिजहराने 

हे जहर मारण्या जहर झालो 


संपला तो निशांत मेल्यावर 

मात्र गझलेत मी अमर झालो

............................................

No comments:

Post a Comment