१.
घेतले नरहरीने माप ज्या विठ्ठलाचे
बंद डोळ्यांस वाटे रूप हे शंकराचे
भेद संपून जाता सत्य बाहेर आले
संपले वाद सारे त्या क्षणी अंतराचे
देव आहेस तू तर जाणतो सर्वकाही
विठ्ठला, संपवावे दुःखही वंचिताचे
मोह झाला कितीही दानपेटी नको ती
कर्म वाढेल त्याने आपल्या संचिताचे
सर्वसाक्षी हरी तो पाहतो वाळवंटी
संपवी चंद्रभागा पापही भाविकाचे
२.
संपली आता निराशा साठली होती
या मनाला आज आशा भेटली होती
लागला आता किनारा वादळामध्ये
सागराने नाव माझी तारली होती
सोडता माझी गुलामी मुक्त मी झालो
स्वाभिमानाची पताका घेतली होती
बोलली आता मला तू चांगले केले
फोडलेली दारुची ती बाटली होती
वेदनेची धार माझी थांबली होती
तीव्र दुःखाची नदी ती आटली होती
३.
मी जगाला दोष माझे काढताना पाहिले
झाकले होते तरीही शोधताना पाहिले
घेतला आधार त्यांचा ओळखीचे वाटले
पाय माझे आपल्यांनी ओढताना पाहिले
का बळीला फास घ्यावा वाटतो राबूनही
सावकारी कर्ज होता टांगताना पाहिले
कोण आहे आपले अन् कोण नाही आपले
वेदनेने रूप त्यांचे भोगताना पाहिले
सत्य हे सत्तेत जाण्या लागतो पैसा जरी
एकदा सत्तेत येता भ्रष्टताना पाहिले
वाटते धोक्यात आली लोकशाही आपली
संसदेमध्येच नेते भांडताना पाहिले
कर्म आहे मालकीचे हेच आत्मा सांगतो
देह नाही मालकीचा जाळताना पाहिले
..............................................
हेमंत रत्नपारखी,
मंगळवेढा
मो.९८२२२३३३९५
No comments:
Post a Comment