तीन गझला : माधुरी खांडेकर

 




१.


राहिला ना राजवाडा राहिले राजा न राणी 

सांगते आहे तरीही रोज मी त्यांची कहाणी


ऐक ना तू आवडीने श्रावणाची धुंद गाणी 

ऐकली नाहीस पण तू एकही माझी विराणी


ढगफुटी झाली नि सारा गाव आता नष्ट झाला 

घातली बहुधा नभाने आपली घागर उताणी


गौरवर्णी एक राधा सावळ्या रंगात न्हाते 

उच्चतम प्रेमातली ही वेगळी आहे निशाणी


पूर्वजांनी पुण्य केले... मान खुर्चीचा मिळाला 

वास्तवाचे भान ठेवा... संपली आता घराणी 


२.


तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने निरागस

खरी होण्यास ती झालीत चौकस


महागाई कमी होणार नाही

कुणी शोधेल का यावर कधी लस 


तुझी ओळख कशी विसरेन दुःखा

तुझी सोबत असावी हाच मानस


चुका नव्हत्या तरीही मार खाल्ला

उलट बोलायचे नव्हतेच धाडस 


पतंगासारखे आयुष्य माझे

कुणीही कापतो समजुन अनौरस


२.


कैकदा ओथंबलेल्या पापण्यांना रोखले

शेवटी असहाय्यतेचे दोन अश्रू सांडले


नेहमी त्याच्यासभोती भोवऱ्यागत नाचले

ठेवला हातात दोरा अन् मला गुंडाळले 


हारणे माझे तुला मंजूर नाही आजही

याचसाठी हारणारा डाव सुद्धा जिंकले


माणसे सारी सुखाने नांदताना पाहिली

स्वप्न हे खोटे तरी सत्यात यावे वाटले


अंगणी प्राजक्त माझ्या अन् फुले दारी तिच्या 

सत्यभामेच्या मनाला दुःख याचे टोचले

...............................…............

1 comment: