तीन गझला : अनिल जाधव

 




१.


छातीवरती करतो हल्ला, पाठीवरती मारत नाही

शिंगावरती घेतो शत्रू, कधी कुणाला हारत नाही 


मी कष्टाची भाकर खातो, दिवसाला अन् रात्रीलाही

बेईमानी करुन पिलांना, घरात माझ्या चारत नाही


जेथे जेथे जाणिवपूर्वक विचार वाईटाचा होतो

तेथे तेथे द्वेष पसरतो, देव अशांना तारत नाही


हिंसा, दंगे, अपराध्यांचे  तांडव पाहुन देशामध्ये;

घाबरलेली जनता म्हणते, हा तर माझा भारत नाही


आपुलकी अन् प्रेमभावना हृदयी माझ्या जपतो मीही

काळजात ती जिवंत असते, कधीच *तेधे वारत नाही.


२.


सुताने स्वर्ग गाठावा, अशी इच्छा मुळी नाही

चुकीचा पाठ गिरवावा, अशी इच्छा मुळी नाही


मला वाटायचे आहे जगाला प्रेम माझेही

कुणाचा द्वेष पाळावा, अशी इच्छा मुळी नाही.


असे व्हावे तसे व्हावे, मनाला वाटते माझ्या

मनोरा हाच तोडावा, अशी इच्छा मुळी नाही


दुधाने पोळल्यावर बघ, कसे ताकास त्या प्यावे

नियम हा मीच शिकवावा, अशी इच्छा मुळी नाही


सतीचे वाण आहे हे, तुला ते घ्यायचे आहे

असा आदेश फर्मावा, अशी इच्छा मुळी नाही


मनाने हारल्यावरती किती मृतप्राय होतो मी

तरीही ढोल वाजावा, अशी इच्छा मुळी नाही.


धुळीला जर मिळाली ही, प्रतिष्ठा जी कमावीली 

तरीही गोडवा गावा, अशी इच्छा मुळी नाही


३.


कशाचा धूर आहे हा

पसरला दूर आहे हा


मनाला झोडतो माझ्या

व्यथेचा खूर आहे हा


गुन्हा संगीन घडल्यावर

प्रवाही पूर आहे हा


दयामाया नसे ठायी

किती निष्ठूर आहे हा


प्रतिक्षा सोसवत नाही

गडी आतूर आहे हा


पसरला चेहर्‍यावरती

प्रितीचा नूर आहे हा


जगाशी एकटा लढतो

शिपाई शूर आहे हा

.............................................

No comments:

Post a Comment