१.
मनासारखे नाही घडले, काय बिघडले?
भेटीत जरा मन कसनुसले, काय बिघडले?
चालू दे ना ज्याच्या त्याच्या गतीप्रमाणे
कुणी जरासे मागे पडले, काय बिघडले?
वाट्यास व्यथा आली म्हणून रडावेच का?
दुःखामध्ये थोडे हसले, काय बिघडले?
संसाराचे सगळे फासे तुझ्याच हाती
आणि सोंगटी जर मी ठरले, काय बिघडले?
नेहमीच मी तुला जवळचा मानत आले
तुलाही तसे वाटत नसले, काय बिघडले?
२.
आकाशीच्या चंद्रासम तू दूरदूरचा तारा
ऐलतटासम उभी इथे मी अन् तू पैलकिनारा
औषधपाणी जारणमारण करून सगळे झाले
ह्या प्रेमाच्या व्याधीसाठी सांगा कुणी उतारा
प्रहर कोवळा आयुष्याचा सरला आहे बहुधा
दिवसामाजी चढतो आहे प्रौढत्वाचा पारा
नकोच बाधा, दारेखिडक्या बंद ठेवते आहे
भवताली द्वेषाचा फिरतो दूषित अशुद्ध वारा
आभाळाची माया मोठी दानतसुद्धा मोठी
कोरडलेल्या भुईस आहे केवळ एक सहारा
३.
तुझ्या आठवांनी पुन्हा घात केला
पुन्हा खून अगदी सुशेगात केला
गुन्हा एक मोठ्या दिमाखात केला
तुझा हक्क बंदिस्त हृदयात केला
किती राग केला मनाने मनाचा
निवाडा स्वतःच्या विरोधात केला
उद्याचे उद्यावर दिले सोडुनी मी
बदल एवढा हा स्वतःच्यात केला
कशाला सहावे तुझे वागणे मी
परतवार मीही क्षणार्धात केला
कसर एवढीही दिसावी न कोठे
उपद्व्याप ऐसा हिशोबात केला
कुठे मारलेलास तू तीर मोठा?
तुझा तू बडेजाव विश्वात केला
..............................................
मेघना पाटील
९००४६४६००२

No comments:
Post a Comment