१.
कशी रे मी मुकी अन् ठार बहिरी झाले
तुझ्या प्रेमात पडले अन् खुळीही झाले
तुझ्यासाठीच काळीपांढरी मी झाले
कधी संत्रा, कधी लिमलेट गोळी झाले
मनाचे रंगही माझ्या तुला ना दिसले
तुझ्यासाठीच तर मी आज होळी झाले
दिला मी हात हाती सहज अंधाराच्या
उजेडाला तुझ्या साक्षात पणती झाले
अता गाभा मनाचा या कसा लपवू मी?
उभ्या जन्मी तुझ्यासाठीच पोळी झाले
जुगारी तू जरी आहेस कळले होते
तरी कर्जात प्रेमाची दिवाळी झाले
२.
माझे नि जीवनाचे अजिबात जमत नाही
मृत्यू कुठे हरवला...काहीच कळत नाही
पचवून अपयशाला गेला पुढे ससा पण
लोकांस कासवाची का हार पचत नाही?
ठरवायचे कितीदा सोडायचे तरीही
डब्बीच काजव्याची शोधून मिळत नाही
बहुतेक गाव आले थांबायला हवे पण
चौकात आज माझे कोणीच दिसत नाही
असते खबर मनाला येणार तू तरीही
लाचार काळजाला काहूर सलत नाही
पोटास काय आले पाहू नकोस पोरी
गर्भातल्या कळीला तर माय खुडत नाही
गेली भरून झोळी माझी किती सुखांनी
माझ्या घरात आता काहीच सरत नाही
देतेस संकटांना आमंत्रणे कशाला?
आलेच सहज वादळ तर काय उडत नाही?
३.
चांगली माणसे पांगली
कोणती माणसे थांबली ?
चालता-बोलता आपली
का उगी माणसे भांडली
मांडता डाव सोपा जरी
मग कशी माणसे हारली
पेरता माणसे मी अता
उगवली माणसे आतली
जाणिवा करपल्या मग पुन्हा
बाप रे माणसे लाभली
हरवली माणसे पण तरी
शेवटी माणसे शोधली
सोडला देह मी साजरा
का अता माणसे थांबली
.............................................

No comments:
Post a Comment