१.
आयुष्यभर तसाही जगण्यात त्रास आहे
थांबूच मग कशाला खडतर प्रवास आहे
नाही विचार पटले त्यांचे मला तरीही
माणूस जोडणे हा माझा प्रयास आहे
तू सांगतो कुणाला दुःखा तुझी कहाणी
कोणी सुखात नाही जो तो उदास आहे
अपुल्या घरात राजा जर व्हायचेच आहे
पाळून मौन घ्यावे जीवन झकास आहे
प्रेमातला जिव्हाळा असतो कुठे खरा या
हा फक्त भावनेचा शाब्दीक फास आहे
हे मायबाप अपुले साक्षात देव माना
त्यांच्यापुढे जगाचे नाते खलास आहे
२.
या विश्वाचे दुःख कळाया फुलते
राहू दे!
जगणे सुंदर करण्यासाठी झुरते
राहू दे!
कसे आवरू जगताना मी मोह आपुल्यांचा?
मनुष्य आहे दुःखच माझ्यापुरते
राहू दे!
सौख्य भेटले बिनकामाचे पण काय करू मी
माझ्यासाठी दुःख देखणे उरते
राहू दे!
कसा बांधतो सांग सुखाला दाखव मजला तू
मग दुःखाला रस्त्यावरती फिरते राहू दे!
असो झोपडी, महाल मोठा ज्याचा त्याचा पण
फक्त जपाया घरपण अपुले घर ते राहू दे!
मूर्त रुपाचे चित्र काढले पण अपूर्ण आहे
पूर्ण कराया जीवन अवघे तरते राहू दे!
कधी न आटो झरा येथला माझ्या शब्दांचा
शब्द तेवढे माझ्यासाठी स्फुरते राहू दे!
३.
इथे जिंदगीभर झिजवले स्वतःला
नको तेवढे मी तुडवले स्वतःला
मला लाख पैलू असे पाडले मी
हिऱ्यासम इथे मी घडवले स्वतःला
मला कौतुकांची, कुठे थाप होती?
जगाने रडवले हसवले स्वतःला
उन्हाळा उभा सावली सारखा हा
गळे घाम माझा भिजवले स्वतःला
कुटुंबाचसाठी, सुखे त्यागली मी
अहोभाग्य माझे म्हणवले स्वतःला
जुन्या मांडवावर नवे स्वप्न व्याले
नव्या पालवीने फुलवले स्वतःला
नको घाबरू तू उभा मीच पाठी
अशा बोलण्यावर टिकवले स्वतःला
…..........…..............................
No comments:
Post a Comment