१.
तुझा गमछा, तुझे भाषण, तुझा तोरा, तुझे शासन
कधी लाजत तिचे येणे कशी गंधाळते पांदण
कळी चाफ्यात मुसमुसली कशी गालात बघ हसली
तिचा तो देठ करवंदी सदा करतो तिची राखण
वचन मी घेतले जेंव्हा मृगाची स्वाक्षरी झाली
सुचवते काय मोलाचे तिच्या हातातले कंगण
मधाचे बोट लाखाचे कुडी नाजूक बांध्याची
इशाऱ्याची झलक मलमल मला दे रोजची आंदण
दिवे भातात वाफवले सजवले मी कुणासाठी
अरे का आरती हसते समजले ना तिचे कारण
अशा वात्सल्यगाथेचे तुला साक्षात आलिंगन
कधी झोळीत या माझ्या घराचे दे जरा अंगण
तुला राऊळ शोभेना तुला मंदिर नको आहे
कुठे बघ ठेवले आहे स्वतःचे सांगना 'मी'पण
२.
किती काळ गेला अता हासते मी
तरीही जगाला पुन्हा बोचते मी
उसवले कधी जर उसासे मनाचे
स्वतःला स्वतःची क्षमा मागते मी
पुरेपूर जेंव्हा मला वाचतो तू
परत लाडकी पाउले टाकते मी
कुणी तार केली कधी पत्र नाही
जसा भेटला तू तशी भेटते मी
मला जीवनाचा कळे अर्थ जेंव्हा
उभी एकटी का मला वाटते मी
जशा अंतरीच्या कडा विव्हळाव्या
तुला ज्ञात होते मनी जाणते मी
कुणाची कवाडे कुठे सावलीही
उन्हाच्या झळांनी इथे पोळते मी
३.
मेल्या ढोराचाही तेंव्हा ,आत्मा अविरत तडपत होता
सूर्य बिचारा हळहळणारा, गोष्ट कालची सांगत होता
आकाशाला काय विचारू, हृदय भरोनी आले त्याचे
मला न वदता येई रे तो, काय एवढे मागत होता
इतके छळणे विकृतीच की, मेंदूमध्ये बिघाड होता
धंद्यामध्ये अडसर म्हणुनी, एक पायरी तोडत होता
तू जन्माला आला तेंव्हा, पांगच फिटला या देहाचा
विटाळ माझा तुला म्हणू की, तुझा मला तर खटकत होता
पहाट झाली नैतिकतेची, जळजळ वैरी बावरला हो
पिल्लू उरले-सुरले त्यांचे, गूण नव्याने उधळत होता
शंका अजुनी गेली नाही तुझ्या मनाची रुखरुखणारी
रोज सोसतो घाव जिव्हारी नजर चोरुनी बाटत होता
बाबाने तर भेद न केला रक्त आपले एकसारखे
सर्वधर्म समभाव ठेवुनी माणुसपण तो जोडत होता
..............................................
No comments:
Post a Comment