तीन गझला : सतीश गुलाबसिंह मालवे

 



१.

तसेही मन कुठे नव्हतेच लागत
म्हणुन बसलोय छायागीत ऐकत

जसा दिसला समीक्षेचा कवडसा
खयालांची दशा झाली धुक्यागत

तुझ्या छायेत जगणे शक्य नाही
तुझा हेतू दिसत आहे उन्हागत

जरी काट्यातले घरदार माझे
मला सांभाळले जाते फुलागत

कसा जगणार या चिखलामधे मी
कमळसुद्धा मला नाही विचारत

स्वतःची  चव  इथे गेली तरीही
समजतो का स्वतःला मी मिठागत?

तुला घेऊन सूर्या सोबतीला
निघालो आजही अंधार तुडवत

२.

तुला कुठल्या प्रमाणाची गरज नव्हती
स्वतःला सिद्ध करण्याची गरज नव्हती

“स्थिती माझ्यापुढे इतकी बिकट होती..."
तरी गळफास घेण्याची गरज नव्हती

तसाही या दरीवर जीव जडलेला
उगाचच तू ढकलण्याची गरज नव्हती

कटीवर हात ठेवुन बाप असल्यावर
मला कुठल्या विठोबाची गरज नव्हती

जरी खजिना अचानक लाभला आहे
असे नव्हते नकाशाची गरज नव्हती

३.

सागरासारखे मन तुझे
छान होईल मंथन तुझे

एकटा आज पडशील तू
होत आहे विभाजन तुझे

बेत आधी समजला तुझा
मग कळाले प्रयोजन तुझे

रोज लिहितो गुलाबी गझल
फक्त दे एक चुंबन तुझे

लागली काय उचकी तुला
नाव घेतो मनोमन तुझे

बुद्ध दिसणार नाही तुला
आड येते प्रलोभन तुझे

फार विद्वान आहेस तू
ऐकले मी प्रबोधन तुझे

...........................................
सतीश गुलाबसिंह मालवे,अमरावती
ह.मु. शिक्रापूर, पुणे
मो 9527912625

No comments:

Post a Comment