१.
दोष देऊ कुणाला कसा नाव घेऊ कुणाचे कसे
हासण्यावर तिच्या भाळुनी मीच केले स्वतःचे हसे
सांगताना लबाडी तिची काळजी घेतली मी किती
नाव पुसताच सांगीतले 'आठवेना मला फारसे'
पाहिले मी मला जेवढे, तूच दिसलीस डोळ्यांपुढे
खोट नजरेत माझ्याच अन् फोडले मी उगा आरसे
कोण जाणे कधीची व्यथा आत हृदयामधे दाटली
आज करतो तिची मी गझल आज करतो तिचे बारसे
जाळल्या सर्व खाणाखुणा जाळली मी तुझी आठवण
तूच श्वासातुनी दरवळे सांग हृदयास जाळू कसे
गाजराचे मळे लावले लावले फास चोहीकडे
धावुनी धावतिल कोठवर पारध्याच्या पुढे हे ससे
२.
भाळला ना कधी पामरावर दगड
ठेवला मीच मग या मनावर दगड
माणसाची कदर कोण करतो तिथे
देव दिसतो जिथे सजवल्यावर दगड
मी कसा सभ्यतेवर भरोसा करू
फळ मिळाले मला मारल्यावर दगड
उंच माडी तुझी काय माहित तुला
फोड येतो कसा फोडल्यावर दगड
ज्या घराने दिली संयमाला बगल
येत गेले पुन्हा त्या घरावर दगड
वादळाच्यापुढे हात जोडू नको
ठेव तू आपल्या छप्परावर दगड
मी कुणाला कसा आरसा दाखवू
सर्व हातांमधे पाहिल्यावर दगड
तेच आलेत बघ हार घेउन पुढे
फेकले काल ज्यांनी तुझ्यावर दगड
३.
मोहात पाडणारे थांबे अनंत बाळा
आजन्म संयमाचा पायात घाल वाळा
होतो जिवंत तेंव्हा नव्हते कुणीच माझे
मेल्यावरी जगाला आला किती उमाळा
कळवा कुणीतरी त्या वर्गातल्या फुलाला
डोळ्यांत आसवांची भरते अजून शाळा
पूर्वी कधीतरी तो गावात भेटलेला
आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा
डोळ्यांसमोर येते बहिरी, मुकी विवशता
ताटातुटीस अपुल्या देऊ नको उजाळा
भेटायला तिला मी मनमंदिरात जातो
माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा
माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे
तूर्तास नाव माझे यादीमधून गाळा
.............................................

No comments:
Post a Comment