१.
मनावर घाव झालेला दिसत नाही
मनाचे बिंब मुखड्यावर पडत नाही
किती शिकले जरी गेलेत चंद्रावर
प्रथा इथली खुळी काही सरत नाही
त्वचेच्या पादुका केल्या मुलांनी पण
तरी ऋण मायबापाचे फिटत नाही
कितीही वागले दुर्जन दिखाव्याने
तरी बदमाश वृत्ती ही लपत नाही
जरी असली जवळची माणसे सोबत
तुला विसरायचे दुःखा, जमत नाही
२.
कष्टाने जीवन माझे फुलवत गेले
संसाराचा गाडा मी हाकत गेले
जीवन जगताना आले संकट मोठे
प्रेमाची फुंकर मारुन नमवत गेले
काळोखाशी ही झुंज दिली हिमतीने
जगण्याच्या नव वाटेला शोधत गेले
हेवा, मत्सर वाट्याला आला माझ्या
माणुसकीने द्वेषाला हरवत गेले
जमते जे सारेच नियम पाळत गेले
सुखदुःखाचे क्षण सारे जोडत गेले
३.
शोधू कसा कुठे मी जगण्यात गंध आता
जीवन-प्रकाश झाला भलताच मंद आता
दारात मोगरा अन् जाई, जुई, चमेली
ना राहिला फुलांना कसला सुगंध आता
गेला निघून का तू सोडून एकटीला
स्वप्नात रोज येणे व्हावे न बंद आता
डोळ्यांत आठवांचे दररोज उष्ण पाणी
घालीन भावनांना हलकेच बंध आता
सोबत नको कशाची शब्दांत जीव रमला
वृत्तांत काव्य लिहिणे जडलाय छंद आता
..............................................
अनिसा सिकंदर,ता.दौंड, जि.पुणे
मो.९२७००५५६६६
No comments:
Post a Comment