१.
अंगणामधे माझ्या घातले सडे होते
यायचे सुखाला पण फार वावडे होते
स्वार्थ साधण्यासाठी मित्र होउनी आले
बोलले सरळ ते पण, अर्थ वाकडे होते
रोज त्याच शाळेची आठवण मला येते
तू नि मी जवळ बसलो...एक बाकडे होते
दुःख अन् सुखाचा मी तोल ठेवला होता
दुःख ज्यात भरले, जड तेच पारडे होते
ओल साचली नक्की आत खूप भिंतींच्या
कोरडेपणाची खुण देत पोपडे होते
२.
लेवुनी संस्कार आली
लेक कर्तबगार झाली
दार उघडे ठेवले मी
शांतता अलगद पळाली
भेटणे नाहीच जमले
पण तुझी पाठव खुशाली
सत्य सापडले जगाला
पेटल्यानंतर मशाली
मी अजुन संतुष्ट नाही
एक इच्छा हे म्हणाली
३.
गर्दीस टाळण्यासाठी एकांती बसले होते
मन संयमीत होण्याचे ते कारण ठरले होते
सोडून जायचे ठरले पाहून दिखावा सगळा
हा प्रवास खोटा आहे प्रतिभेला कळले होते
पाऊस किती भरलेला डोळ्यात पाहिला होता
कोसळला नाही पण मी नखशिखांत भिजले होते
माघारी माझ्या त्यांनी कटकारस्थाने रचली
येताच पुढे दुःखांचे मी डाव उधळले होते
फुलपाखरासही कळले नजरेचे रंग बदलणे
तळहातावरुनी मग ते हलकेच निसटले होते
..............................................
अंजली आशुतोष मराठे,
बडोदे, गुजरात

No comments:
Post a Comment