१.
सत्य जपणे ही तपस्या असते
माणसाची ती परीक्षा असते
जीव लावुन ज्यास मोठे केले
शेवटी त्यांची प्रतीक्षा असते
वेदना कुरवाळतो प्रेमाने
अंतरीची ही तितिक्षा असते
पंख खोलुन झेप घे स्वप्नांची
ओढ कायम अंतरिक्षा असते
लेखणीतुन रक्त झरते ज्यांच्या
गोड त्यांची मग समीक्षा असते
सारथी ज्यांचा हरामी निघतो
जन्मभर त्यांची समस्या असते
काळजाची काळजी घे 'रौशन'
प्रेम हृदयाची सुरक्षा असते
२.
साथ-संगत हरघडीला रोजची आहे
वेदना मैत्रीण माझी छानशी आहे
वाकुल्या दावून खिजवुन दूर का पळती ?
हाय! शाळा या सुखांची कोणती आहे ?
सूर्य डागाळून माझा लुप्त ग्रहणाने
संपवेना जीवनाची रात ही आहे
सर्व गेलेही जरी, श्वासात ती माझ्या
वेदनेची प्रीत इतकी लाघवी आहे
ती अशी बिलगून अद्वैतात विरघळते
घट्ट पकडुन हात माझी सोबती आहे
धन्य मी ना मागताही साथ ती देते
काय सांगू प्रीत इतकी आंधळी आहे
काय हिंमत पामराची अन् सुखांचीही !
ना कुणी स्वप्नात इतकी नागवी आहे
कडकडाडुन भेट व्हावा अंत तृष्णेचा
ईहलोकी भेट माझी धावती आहे
वेदना सांभाळणे कर्मात रे 'रौशन'
नीयती दाखव जरा तू जागती आहे
.................................….........
युवराज नळे 'रौशन', उस्मानाबाद

No comments:
Post a Comment