१.
व्हायला सुंदर गझल नस सापडावी लागते
आतमध्ये एक ठिणगी जाळ व्हावी लागते
झोपडी अंधारलेली रात्रभर किंचाळते
श्वापदांची भोगइच्छा भागवावी लागते
नेमकी नाही स्मरत कविताच जेव्हा आपली
ओळ एखादी अगोदर आठवावी लागते
ज्ञानप्राप्ती शक्य नाही याविना कोणासही
अंतरीची ज्योत आधी पेटवावी लागते
वासनेसोबत अपेक्षा चाळली जाते कुठे
एक त्यापैकी मनाला पाखडावी लागते
आज लढताना हुतात्मा तो जरी झाला तरी
दुःखदायक बातमी पण पोचवावी लागते
रेघ प्रगतीची कुणाची ना करत आखूड मी
रेघ प्रगतीची स्वतःची वाढवावी लागते
२.
पक्ष्यास पारध्याने चकवू नये पुन्हा
कुठल्याच पाखराला फसवू नये पुन्हा
आयुष्यभर भिजवले लाखो रुमाल मी
हळव्या मनास इतके दुखवू नये पुन्हा
दोघे मुळात आता आहेत पेटले
ओतून तेल भडका उडवू नये पुन्हा
उपजत मुलीस कळतो स्पर्शातला फरक ...
नजरेत काय दडले शिकवू नये पुन्हा
कळला नसेल मृत्यू , म्हणतेय लेकरू
'झोपेत गाढ आई उठवू नये पुन्हा'
विश्वास मनगटावर आहे खरा तुझा
मग उंबरे कुणाचे झिजवू नये पुन्हा
चुकले नसूनही मी झुकलो बरेचदा
झुकलो म्हणून कोणी झुकवू नये पुन्हा
३.
तो विदूषकासोबत प्रेक्षकात वावरतो
दुःख हासण्याआधी पापण्यात साठवतो
प्रेमपत्र लिहिण्याचे खूपदा ठरवतो पण
मी 'प्रिये' लिहावे का...संभ्रमामधे पडतो
चिंब पावसामध्ये ती अशी बिलगते की
थेंब पावसाचाही उष्ण फार जाणवतो
जागतो दचकतो अन् सारखा रडत असतो
तो भिती अशी घातक बालकास दाखवतो
नाटकातला अभिनय नाटकी तिचा असतो
भूमिका खऱ्या इतक्या नेहमी तिच्या बघतो
जन्मलो कशासाठी जन्मभर विसरतो मी
'मोक्ष' साध्य जन्माचे शेवटास आठवतो
जे करायचे जेव्हा ते करून घे तेव्हा
काळ वेळ मृत्यूची घोषणा कुठे करतो ?
...............................................

No comments:
Post a Comment