१.
कुणा वाटते जीवन म्हणजे घोर निराशेचे घर आहे
हवे तसे तू जगून घे रे मित्रा जीवन सुंदर आहे
अनंत दु:खे साहत झाले मन हळवेसे अंतर्यामी
तरी पहा जीवना लावली आनंदाची झालर आहे
खूप हवेसे काही बाही त्यासाठी धडपडतो आपण
अजून कोठे मुखात अमुच्या शुद्ध सुखाची भाकर आहे
*पंख फुटावे जरी मनाला स्वैर भरारी नभात घ्यावी*
*अभिमानाने जग जिंकावे पाय तरी जमिनीवर आहे*
असंख्य गाठी अवघड गुंता जीवन म्हणजे विचित्र कोडे
प्रत्येकाची भविष्यरेषा मित्रा तळहातावर आहे
जीवन म्हणजे चढण्यासाठी उंच किती दुःखाचा डोंगर
त्याच डोंगरामागे बहुधा एक सुखाचा सागर आहे
सगेसोयरे सभोवताली वैऱ्याचेही प्रेम जडावे
मृत्यू म्हणतो जगून घे रे माझे येणे नंतर आहे.
२.
आयुष्या रे हात तुझा मी पक्का धरला आहे
म्हणून तर हा मृत्यू सुद्धा अखेर हरला आहे
सहानुभूती, दया, करूणा कुणात शिल्लक नाही
माणुसकी असलेला कोणी विरळा ठरला आहे
वृक्ष तोडले रान पेटले नद्या आटल्या जेव्हा
जगास अपकारी वृत्तीचा फटका बसला आहे
खरेपणा अन् विश्वासाला कुठेच नाही थारा
आपसातला स्वार्थ तेवढा पुरून उरला आहे
शांतीचे, मैत्रीचे वारे कसे वहावे येथे
प्रत्येकातच क्रूर अधर्मी दानव लपला आहे
थोडेसे का होईना पण दुःख असू दे देवा
आनंदाचे मोल अशाने कळते मजला आहे
एक शिवावे दुसरे फाटे नित्यच विवंचना ही
सामान्यांनी कसे जगावे प्रश्नच पडला आहे
दुःख आपुले रिते कराया मैत्र हवे हक्काचे
ह्या निर्मळ नात्याला मानव खरेच मुकला आहे
अजून येथे देव कुठे हो कुणी पाहिला सांगा
शोध जरा तू, तो साक्षातच तुझ्यात वसला आहे.
३.
वाढली विकृती, गोठल्या भावना
लुप्त झाल्यात संवेदना, चेतना
दुर्मती द्वेष काढून घे दु:ख तू
हीच विघ्नेश्वरा नित्य आराधना
आपदा दूर होण्या तुला साकडे
ठेव सारे सुखी ही मनोकामना
अंतरंगात श्वासात प्राणात तू
नित्य एकांतवासी तुझी साधना
दीन कष्टी दरिद्री नि लाचार मी
ह्या अभाग्यास देवा अता पावना
राहिले ना कुणी मित्र वा सोयरे
आत्मविश्वास तू सोबती जीवना
जो दिसेना कुठे सर्वव्यापी जरी
देव आहे निराकार संकल्पना!
.....................…......................

No comments:
Post a Comment