तीन गझला : डॉ. विद्या देशपांडे

 


१.


नकोशी मला वाटते ही कहाणी 

असे ज्यात माझीच दुःखी विराणी 


पहा सांजवेळी उन्हे दूर गेली 

फुले धुंद आता खुळी रातराणी


पुन्हा आठवांच्या सरी येत गेल्या 

पुन्हा पापण्यांतून दाटेल  पाणी


किती वेगळे रंग ते जीवनाचे

निळाईत मी  रंगलेली दिवाणी


नसे खेद कोठे नसे खंत काही

तुझी साथ आणील ओठांत गाणी


निखळ सूर सच्चा मनाला भिडावा 

कशाला हवी ती घराणी-बिराणी ?


२.


पुन्हा तोच वारा पुन्हा तो किनारा

पुन्हा लाट धावेल शोधत निवारा


किती आवरू मी तरी आवरे ना 

तुझ्या आठवांचा खुळा हा पसारा


तुझ्या चेहऱ्याची अशी जादु आहे 

तुला पाहताना उमटतो शहारा


सरळ सांग ना की तुझे प्रेम आहे

नको जीवघेणा तुझा हा इशारा


सतत मी तुझ्या का विचारांत असते

अता नेमका यास दे तू उतारा


तुला भेटण्याची किती ओढ आहे

कशी टाळुनी सांग येऊ पहारा 


जराशा बरसल्या सरी पावसाच्या

जुन्या शुष्क वेलीस फुटला धुमारा

 

कुठे चालली नाव काही कळेना

दिशा दाखवेना नभातील तारा


३.


उरातली घुसमट मी आता सहन करू ना शकते 

पांघरते मी शब्दझूल अन् लेखणीतुनी झरते


एकेकाळी तुझ्या नि माझ्या चर्चा रंगत होत्या

दिल्या घेतल्या शपथा खोट्या अता मनाला कळते


झुगारले तू प्रेम आपले स्वार्थासाठी सखया 

समजावुनही मानत नाही वेडे मन आसुसते


दिवस उगवतो आशेचा नव किरण प्रकाशत येतो

उतरत येते सांज सावली  निराश मन व्याकुळते


परतून अता  कधि ना येशिल जाणुन मीही आहे

चिवट आस हृदयातिल जपुनी मुक्या मनाने रडते

.......................................

No comments:

Post a Comment