१.
अनंता, तुला सांग वर्णू कसे?
तुझे एक मी नाव घेऊ कसे?
म्हणे आंधळेही तुला पाहती
तसे मी तुला सांग पाहू कसे?
सदा सर्वठायी जगी व्याप्त तू
तुला मंदिरी फक्त भेटू कसे?
धरा, सूर्य अन् चंद्र सारे तुझे
वसे फार तू दूर मानू कसे?
निराकार निर्गुण असा तू कसा?
तुझा वास श्वासात सांगू कसे?
२.
उगाच रात्री छळून गेली
भयाण स्वप्ने पडून गेली
कुशीत आली अनाथ दुःखे
हळूच आई म्हणून गेली
रवी उगवला दिशा मिळाली
निशा भयावह पळून गेली
दुरावलेली असंख्य नाती
मनास मजबुत करून गेली
सुगंध वाटत सदा जगाला
फुले बिचारी सुकून गेली
मनात रुजली नवीन स्वप्ने
अनेक विघ्ने दुरून गेली
गमावले मी पुरात सारे
नवी मनीषा मिळून गेली
३.
दु:खात फार हसले, रडले कधीच नाही
सांगून मी कुणाला कळले कधीच नाही
झेलून ऊन, वारे करपून आस गेली
छायेत मी सुखाच्या रमले कधीच नाही
वेषात माणसांच्या छळतात राक्षसे मज
जाळ्यात पण कुणाच्या फसले कधीच नाही
सांभाळते मुलांना आठवत हिरकणीला
पाहून रात्र काळी वळले कधीच नाही
गाडून खोल स्वप्ने संसार मात्र करते
झटकून हात जगणे जमले कधीच नाही
...............................................

No comments:
Post a Comment