तीन गझला : चंद्रकांत धस

 




१.

नका विचारू आयुष्याने मला नेमके काय दिले
दुःखाचे वटवृक्ष आणखी सौख्याचे बोन्साय दिले

न्याय-नितीची किती कुचेष्टा हतबलतेचा कहर जणू
हात जोडता न्यायासाठी पदरी हे अन्याय दिले

शेतीप्रधान देशामध्ये किती आजही भूकबळी
भूक शमाया अन्नावाचुन कुठे कुणी पर्याय दिले?

मानच झुकते नारी जेव्हा विकते देहा बाजारी
पोटासाठी का दैवाने नको तेच व्यवसाय दिले?

कधी यशाचा कधी धनाचा गर्व व्हायला नको म्हणून...
नतमस्तक मी होण्यासाठी गुरूजनांचे पाय दिले

कधी कुणाला कळला नाही अंत मनाचा कोणाच्या
त्यास वाचण्या आयुष्याच्या ग्रंथाचे अध्याय दिले

२.

वेग वाऱ्याचा भिने अंगात माझ्या
राहिलो नाहीच मी ताब्यात माझ्या

गरज नाही लागली कोण्या नशेची
जन्मभर मी वागलो कैफात माझ्या

भिस्त होती ठेवली ताऱ्यांवरी मी
रिक्त झोळी शेवटी हातात माझ्या

लागला होता सुगावा मज सुखाचा
वाढली दुःखे कुणी ताटात माझ्या?

आटले पाणी पुरे डोळ्यांतलेही
वेदना भिनल्या अशा हृदयात माझ्या!

भाग्य माझे थोर भावांनीच केले
माय-बापा टाकले वाट्यात माझ्या

हात नाही जोडले आजन्म देवा
नाम आले शेवटी ओठात माझ्या

३.

ये जराशी कात टाकू
भेदणारी जात टाकू

चेतवूया यज्ञकुंडा
धर्मही त्याच्यात टाकू

वेसही झाली खुली बघ
राहुटी गावात टाकू

कावळ्याला पोट आहे
एरवीही भात टाकू

वेध घेऊ दांभिकांचा
बाण मग भात्यात टाकू

जागवू साऱ्या जगाला
प्राणही वाऱ्यात टाकू

ध्येय विश्वा जोडण्याचे
पावले जोमात टाकू
..............................................
चंद्रकांत धस,
मो.नं.९९७०४५२५२५

No comments:

Post a Comment