१.
पाठीवरचे जरी उतरले दप्तर आहे
प्रवास पुढल्या आयुष्याचा खडतर आहे
रोज नव्या ह्या जबाबदाऱ्या वाढत जाती
जगण्यासाठी किती चालली मरमर आहे
धर्मापायी मुडदे पडती मानवतेचे
कट्टरतेचा रोग लागला दुर्धर आहे
सुसह्य झाला प्रवास माझ्या आयुष्याचा
मला लाभली तुझ्यासारखी सहचर आहे
सरता नाही सरत कसा हा काळ उतरता
बालपणीचा काळ संपला झरझर आहे
२.
हात सोडला रस्त्यावरती
निघून गेली अर्ध्यावरती
तोंडावरती गोड बोलुनी
घाव घातले हृदयावरती
जगण्यासाठी मरमर इतकी
किती फायदे मेल्यावरती
खडा बुडाला डोहामध्ये
तरंग उठले पाण्यावरती
गोल गोल तू किती फिरवतो
जरा बोलना मुद्द्यावरती
भरडत होत्या बाया तेव्हा
सुखदुःखाला जात्यावरती
मनासारखे जगायचे तर
मार जगाला फाट्यावरती
३.
गावे गिळुनी शहरे फुगली
ह्याला आम्ही प्रगती म्हटली
वने तोडुनी विकास केला
पण श्सासांची गती रोखली
पुन्हा भोगण्यासाठी सत्ता
पुन्हा पेटल्या इथे दंगली
रियल लाईफ विसरून कशी
रीलमधे ही पिढी गुंतली
उदास बसला पार एकटा
गळून पडता पाने पिकली
साधी सोपी गोष्ट एवढी
तुला न कळली मला न कळली
............................................

No comments:
Post a Comment