अमरावती येथील माझ्या फेसबुकवरील मित्र आणि सुप्रसिद्ध कवयित्री आणि गझलकारा आदरणीय पुष्पाताई पुंडलिक दलाल यांचा 'पापणकळा' हा गझलसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. तशा अधूनमधून त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या गझला वाचून मी नेहमी कमेंट करायचो आणि तसा गझल या काव्य प्रकाराचा माझा विशेष असा अभ्यास नाही. पण कोणतीही वृत्तबद्ध कविता दिसली तर ती वाचूनच मी पुढे जातो. यामुळेच पुष्पाताई यांच्या गझलाबाबत मला आवड निर्माण झाली. एकदोन वेळा त्यांच्याशी केलेल्या संपर्कातून त्यांच्या माहिती सोबतच अद्याप त्यांचा गझलसंग्रह प्रकाशित नाही हेही कळालं आणि मनाला थोडी चुटपुट लागून राहिली. कारण त्यांच्या माझ्या वाचनात आलेल्या गझला या वाचकांना अत्यंत अंतर्मुख करायला लावणाऱ्या होत्या. अशा कविता समाजासमोर यायलाच हव्यात असं मनोमन वाटायचं आणि एके दिवशी गेल्या जानेवारी महिन्यात पुष्पाताईंचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की या महिन्यात माझा गझलसंग्रह प्रकाशित होतोय. तोही पंढरपूर येथून. हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला. सर्वांचं अंतर्मन जाणणाऱ्या पांडुरंगाला पुष्पाताईंच्या मनातील सल कळाला होता आणि त्यानेच ही योजना केली असावी असे क्षणभर वाटून गेले. आणि परवा मला पोस्टाने हा गझलसंग्रह प्राप्त झाला. एका शेतकरी कुटुंबातील आणि वयाच्या लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना पुष्पाताई यांची लेखणी अत्यंत परखड झाल्याची जाणीव त्यांच्या गझला वाचताना होते. समाज व्यवस्थेने कायम दुर्लक्षित केलेल्या आणि अन्यायाचा सतत सामना करणाऱ्या घटकाच्या त्या कैवारी होतात. सध्या सगळीकडे कोणत्याही वयातील स्त्रीला असुरक्षित वाटत आहे यावर लिहिताना त्या म्हणतात -
"पाठीत खंजिराला बांधून ठेव पोरी"
"पात्यास धार थोडी लावून ठेव पोरी"
प्रस्थापिताकडे सत्ता आणि पैसा असल्यानंतर त्यांच्या वागण्यात आपोआप मग्रुरी येते त्या विषयी -
हवा नावात असल्यावर,
दवा पेल्यातली चढते.
मजेने रात्रही सरते,
मजेने सूर्य कललेला... हे वास्तव त्या नजरेस आणून देतात.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण त्यापासून दुर्बल वंचित समाज कोसो दूर होता. इच्छा असूनही त्याला शिकता येत नव्हते. यावर
रेडा आहे हुशार इथला,
वेद बोलतो खरेच आहे.
मलाच का मग दूर लोटले,
शिकायची मज होती कळकळ.
त्या अशी टिप्पणी करतात.
जीवनात खरी वेळ आल्यावरच कोण आपलं आणि कोण परकं आहे याचा प्रत्यय येतो. म्हणूनच कुणाचे उपकार त्यांना नको वाटतात आणि
नको ना दान देऊ बघ,
रिती ओंजळ बरी आहे.
क्षणाचे सोबती सारे,
खरे तर वाचले होते... असं त्या म्हणतात.
सगळ्याच क्षेत्रात देश पुढे गेला पण सामान्य शेतकरी अजूनही आहे तिथेच आहे. किंबहुना तो हतबल आहे हे सांगताना -
दिसावा बाप बांधावर,
चिलाटीच्या सहाऱ्याने.
तिथे चोरून रडताना,
विषाला प्राशिले आहे.
असं म्हणून शेतकरी आत्महत्येकडे त्या लक्ष वेधून घेतात. समाजातील विषमता आणि जातीयवाद आजही आहे तसाच आहे. याबाबत झालेल्या वेदनेतून त्या
बाळीविना कपाला पाहून काल रडलो.
काळीज कापणारा हा भेदभाव होता.
हे वास्तव सांगून जातात. सध्या पैशाचा विनियोग व्हायचा तिथे होत नाही हे सांगताना -
कळसाला जर सोने आहे,
शाळेला पण छप्पर नाही.
जागृत व्हावे बुडण्याआधी
*अखेर विनवत होते.*
त्या अशी नकळत विनवणी करतात. शेतकरी आपला जीव मातीत मिसळतो. पेरणी करतो ; पण नैसर्गिक आपत्तीने तो होरपळून जातो. हे सांगताना त्या -
अवकाळ पावसाने उन्माद मांडलेला
तो बाप हारणारा निरखून पाहते मी.
या प्रमाणे वर्णन करतात.
लोकशाहीचा चौथा स्तंभसुद्धा सध्या विकला जातोय. यासाठी -
विकतोस काय वेड्या तू पत्रकारितेला.
चल लाव धार आता झुंजार लेखणीला.
असा बोध त्या करतात. अंधश्रद्धेवर त्यांची लेखणी आसूड
ओढते आणि -
पाप करा अन् डुबकी मारा,
गंगेमध्ये धुतल्या जाते.
अन्यायाचा मार्ग मोकळा,
बहुजनास मग लुटण्यासाठी.
सरकारी काम वशिला किंवा पैशाशिवाय कधीच होत नाही. याचाही त्यांनी समाचार घेतला आहे. जाताजाता त्यांनी या गझलसंग्रहातील एका गझलेमध्ये सध्या साहित्यक्षेत्रात चालू असलेल्या अक्षम्य गैरव्यवहार आणि चुकीच्या माणसांच्या होत असलेल्या गौरवाबद्दलही वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या म्हणतात -
अपुलाच मित्र भाऊ सन्मान प्राप्त आहे.
सारी प्रमाणपत्रे माझ्याच माणसाला.
पुष्पाताईंचा 'पापणकळा' गझलसंग्रह समाज प्रबोधनासोबतच चुकीच्या चालीरीती आणि परंपरा यावर सडकून टीका करणारा असून
प्रत्येकाने वाचावा असा आहे.
एवढ्या ताकतीच्या गझला असूनही त्यांनी पाठवलेल्या गझलची निवड अखिल भारतीय गझल साहित्य संमेलनात होऊ नये. साहित्यक्षेत्राचं यापेक्षा मोठं दुसरं दुर्दैव असूच शकत नाही. यावरूनच औकात नसलेले लोक साहित्यक्षेत्रातील खुर्च्या बळकावून बसलेत हे लक्षात येते.
आदरणीय पुष्पाताई उर्फ माई यांच्या साहित्य प्रवासास माझ्या खूप खूप शुभेच्छा !
............................
अशोक मिरगे,
अंबाजोगाई, जि. बीड. मो.7020907842

No comments:
Post a Comment