१.
"सलोखा आपसी राखा" दयेचा सूर झालो मी
खुळ्या गर्वासही हरतो नदीचा पूर झालो मी
जरी ही लेकरे सगळी जगी एका विधात्याची
तरीही भेदभावाने कसा निष्ठूर झालो मी
इथे होत्या प्रथा जुलमी गुलामी लादणाऱ्या पण
दिल्या धुटकारुनी सगळ्या नवा दस्तूर झालो मी
बरा मी आपुल्या जागी, खुजेपण भोवले माझे
कुणाची भिड न केल्याने जगाच्या दूर झालो मी
कुणी नाही कुणासाठी मला कळले उशीराने
निघाले प्राण देहातुन चितेचा धूर झालो मी
२.
पुरावा पेरला जातो, पुरावा चोरला जातो
निरागस फासला जातो,अधर्मी सोडला जातो
खरा इतिहास देशाचा तसाही झाकला गेला
लढा ज्यानी दिला नव्हता,पुढारी मानला जातो
रुपेरी पिंजरा माझा, तरीही कोंडवाडा तो
भरारी मारणाराही शराने पाडला जातो
जयाची भागवावी नड,मुजोरी तो करी आता
उसनवारी दिली ज्याने, भिकेला लावला जातो
तयांची हाव सत्तेची इमानाला तडा देते
भरवशाचा विधायकही दबावे फोडला जातो
तुझी गे द्रौपदाबाई, कहाणी ही नवी नाही
द्युताचा डाव भिष्माच्या सभेला खेळला जातो
असे सत्ता जया हाती,लबाडी चालते त्यांची
कुरोड्या फस्त ते करती,चुराडा वाढला जातो
कुरापत वामनाची बघ, अजूनी चालते येथे
जगाला पोसणारा जो,बळी तर नाडला जातो
कशी तरली म्हणावी मी तुझी गाथा तुकारामा
अडाणी तारला जातो, धुरंधर गाडला जातो
३ .
हसू देत नाही,रडू देत नाही
मरण मागतो पण मरू देत नाही
जगा, नेमके तुज हवे काय आहे?
मनाजोगते मज जगू देत नाही
सदा कोपलेला निसर्गा, असा तू
उभे पीक हाती पडू देत नाही
बळे हाणतो चोप तो, हंटराचे
वळावे तसे मग, वळू देत नाही
उणीवा कितीही असू देत अंगी
तरीही कुणाला कळू देत नाही
कुरापत तयांची सदा आड येते
घडावे तसे तर घडू देत नाही
बघा, आपुल्या तो हुशारीत वाणी
जुना माल त्याचा सडू देत नाही
अहंभाव जेंव्हा स्वभावात शिरतो
यशाचे शिखर मग चढू देत नाही
सदा पाउले टाकतो मी अशी की
चरीत्रास माझ्या मळू देत नाही
...............................
प्रवीण सु.चांदोरे (सुधांशु)
मो:9423663869
No comments:
Post a Comment