तीन गझला : सतीश देवपूरकर

 



१.

एकाच तुझ्या दु:खाने जन्माची सोबत केली
तू नव्हे, तुझ्या स्वप्नाने जन्माची सोबत केली

तू झुळुक कोवळी बनुनी बिलगलीस मज त्या रात्री
पळभरच्या सहवासाने जन्माची सोबत केली

वळणावर अवघड एका सोबती पळाले सारे
पण, त्याच बिकट रस्त्याने जन्माची सोबत केली

संपला चार दिवसांनी दीपोत्सव आयुष्याचा
मग एका काळोखाने  जन्माची सोबत केली

पकडून बोट वाऱ्याचे तो सुगंध निघून गेला
पण रुतलेल्या काट्याने जन्माची सोबत केली

वाटेवर अर्ध्या झाला घायाळ पंख  सोनेरी
पण मातीच्या पायाने जन्माची सोबत केली

ते दिवस गुलाबी गेले काळाच्या पडद्यामागे
पण स्मरणांच्या गंधाने जन्माची सोबत केली

वठलेल्या झाडावरती बहराची एक निशाणी
पिकलेल्या त्या पानाने जन्माची सोबत केली

वळचणीसही कोणाच्या आसरा मिळाला नाही
भिरभिरणाऱ्या वाऱ्याने जन्माची सोबत केली

म्हणुनी प्रकाशवर्षांची अंतरे काटता आली
आशेच्या त्या किरणाने जन्माची सोबत केली

२.

कुणी मागच्या मागे, कोणी वळून गेले
आपले म्हणत होतो तेही दुरून गेले

अनावधानाने खळग्यातच पडलो होतो
कुणी तरी आले अन् मजला पुरून गेले

बिकट वाट चालण्यात इतका गढून गेलो
कळले नाही गाव कधीचे निघून गेले

मीच कसा शेवटी बुडालो कळले नाही
मला ओंडका करून सारे तरून गेले

मनामनाच्या भिंती उरल्या, घरपण सरले
वादळासवे छप्पर जेव्हा उडून गेले

अशी बरसली सर सुमनांची माझ्या दारी
घर तर काठोकाठ फुलांनी भरून गेले

म्हणून दुःखांचाही आहे सदा ऋणी मी
आपत्तींचे वारे मज पाखडून गेले

राखेमध्ये अस्थी नव्हत्या, स्वप्ने होती
कोणी आले आणि मला सावडून गेले

किलबिलणारी पाखरे जशी उडून गेली
हा हा म्हणता उभे झाड ते सुकून गेले

हसू चेहऱ्यावर अन् डोळे उघडे होते
कळे न त्याचे प्राण कसे अन् कुठून गेले

३.

आसवांनी तरी ओघळावे किती
संकटांनी तरी कोसळावे किती

काय करतील या पापण्या सांगना
लोचनांनी तुझ्या हिंदळावे किती

रोज खंगाळतो खिन्नता आतली
काळजाने पुन्हा काजळावे किती

रोज घावावरी घाव होतात हे
रक्तही श्रांतले, भळभळावे किती

अडथळे, अडचणी पावलोपावली
हे वळण, ते वळण, मी वळावे किती

हे हृदय मूळचे तर फुलासारखे
सांग मी जीवना कातळावे किती

काळचक्रा तुझी जाणतो मी गती
हे स्वत:ला असे मी दळावे किती

ध्वस्त झालो पुरा, विखरलो केवढा
आत माझ्याच मी वादळावे किती

मज नको वाटतो हा उदय, अस्तही
मी उजाडू किती, मावळावे किती

पाश हे जिंदगी, रेशमाचे जरी
या गळ्याभोवती आवळावे किती
...............................
प्राचार्य सतीश देवपूरकर
कोथरूड, पुणे
मो.७०३०६८७२५७

No comments:

Post a Comment