तीन गझला : प्रशांत भंडारे

 




१.


काय बदलते आता पाहू बदलीनंतर

मिळेल तेथे निघून जाऊ बदलीनंतर


मिजास कोठे उरली आहे पक्वान्नांची

पुढ्यात आले जे ते खाऊ बदलीनंतर


जन्मजात तर कुणीच नव्हते मित्र जवळचे

भेटणार तेथेही भाऊ बदलीनंतर


बरेच होते रस्ते इथले वळणी पडले

अनोळखी वाटेवर धावू बदलीनंतर


इच्छा असते गाव मिळावे मनासारखे 

पदरी पडले तिथेच राहू बदलीनंतर


करून गेला असेल जेथे खड्डा कोणी

वेल यशाचा तिथेच लावू बदलीनंतर


गाव बदलले नुसते घडवू पुन्हा माणसे

मनात साने, फुले नि शाहू बदलीनंतर


२.


पाकळीला अत्तराचा भार झाला

एक काटा शेवटी आधार झाला


देह रक्ताळून गेल्यावर फुलांचा

माळुनी गजरा तिचा शृंगार झाला


थांबता अभिषेक मातीवर नभाचा

बाप कृषिकेंद्रातही नादार झाला


अर्ज कंटाळून लिहिला बघ दिव्याने

वादळा! ये ताप आता फार झाला


पथ्य आहे माणसाला माणसांचे

माणसाला कोणता आजार झाला


संशयाने पाहतो तो आरशाला

काल ज्याचा मित्रही गद्दार झाला


सासरी गेली असावी लेक बहुधा

ढगफुटीचा सोहळा साकार झाला


घातला गोंधळ हरीने मध्यरात्री

वाटते नाथाघरी अंधार झाला


विठ्ठला, येऊ कसा मी पंढरीला

नेटका माझा कुठे संसार झाला


ओत शब्दांची नशा गझलेत माझ्या

एक घोटाने कधी उद्धार झाला?


मोडला पण वाकला नाही कधी तो

श्रेष्ठ बघ पोटाहुनी संस्कार झाला


शिक्षणाने एक केले माणसांना

व्हायचा तो शेवटी एल्गार झाला


३.


मांडल्या आहेत बाजारात जखमा

संपुनी जातील हातोहात जखमा


काळजीने हात लावा घाव ताजा

स्पर्श होता बावऱ्या होतात जखमा


दूर ठेवा पौर्णिमेचा चंद्र थोडा 

पाहुनी येतात आवेगात जखमा


वेचले आयुष्यभर मी क्षण सुखाचे

भेटल्या नाहीत बिनभावात जखमा


गोठल्यावर बर्फ झाले प्रेम बहुधा

त्याच वेळी वाहत्या झाल्यात जखमा


मोकळा केला जरी मी सातबारा

खानदानी राहिल्या कर्जात जखमा


भावनांचा मोकळा व्यवहार येथे

मी कसा देऊ तुला नोटात जखमा


कर परत जमलेच तर साऱ्याच जखमा

ठेवुनी करणार का ओठात जखमा


लोटले युग, वर्ष, महिने सांगताना

ठेवल्या मी मोजक्या शब्दात जखमा


वेदना आभार मानत तृप्त झाली

मी अशा सांभाळल्या पोटात जखमा

................…...........................

1 comment: