तीन गझला : सौ. गौरी शिरसाट

 




१.


कुणी टाळून गेलेले, कुणी टाकून गेलेले,

मनाच्या भावनांनाही कुणी जाळून गेलेले


नकोशा वाटती त्यांना मुली जन्मास आलेल्या

अशा कित्येक लेकींना इथे गाडून गेलेले


तुझे येणे अचानक अन् मला हे एकटक बघणे

नवी स्वप्ने पुन्हा डोळ्यांत या माळून गेलेले


यशाचे वाटले नाही कधी कौतुक कुणालाही 

पुन्हा नावास माझ्या ते कसे गाळून गेलेले


कसे येऊ पुन्हा भेटायला मी त्याच जागेवर 

जिथे सोबत तुझ्या मी खूपदा भांडून *गेलेले


२.


नकली प्रसाधने अन् शृंगार टाळले

खोट्या प्रलोभनाचे बाजार टाळले


जागा पुन्हा नवी मी शोधून काढली

स्वार्थास साधणारे शेजार टाळले


ना भावला कधीही मोठेपणा मला

वाचाळ माणसांचे सत्कार टाळले


शाश्वत इथे न काही मी मानले कधी

त्याच्यामुळे तुझ्यावर अधिकार टाळले


हरले कधीच नाही कोणापुढे इथे

कमजोर भावनांचे आधार टाळले


३.


तुझ्याचसाठी ठरवत होते रोज नव्याने फुलायचे

वाटत नाही ईप्सित माझे कधी तुला हे कळायचे


आठवणींना तुझ्याच जपले अळवावरच्या पाण्यासम

माझ्याशी पण खोटे खोटे तुझे वागणे छळायचे


घरच्यांचा मी विरोध सारा तुझ्याचसाठी पत्करला

प्रेमासाठी रोज जगाशी जिद्दीने मी लढायचे


रोज नव्याने लिहीत होते कथा आपल्या प्रेमाची

शब्दांमधुनी आठवणींना जिवापाड मी जपायचे


बेफिकिरीचे तुझे वागणे त्रास द्यायचे रोज मला

चुकार अश्रू डोळ्यांमधले पुन्हा पुन्हा मी पुसायचे

...…...................................…..

No comments:

Post a Comment