१.
काय बोलू या जगाशी फोनवर
मारल्या गप्पा स्वतःशी फोनवर
एक नंबर व्यस्त हल्ली लागतो
यायची आधी जराशी फोनवर
भेटलो तेव्हा न फुटला शब्दही
फार केलेल्या मिजाशी फोनवर
राग, रुसवा, प्रेम, माया, काळजी
घट्ट धरले तू उराशी फोनवर
कळवले जे नेमके कळवायचे
बोलली नाही मघाशी फोनवर
२.
आहे जरा माथेफिरू
देहातला भाडेकरू
वळतो मुठी आहे सतत
बसणार का फुलपाखरू ?
तो भ्यायला आहे मला
त्याला कशाला घाबरू ?
होऊन ये तू पानगळ
लागेन मीही मोहरू
प्रेमातही भांडण हवे
हेही करू तेही करू
ही आठवण की वाळवी
काळीज बघते पोखरू
सोबत तुझ्या मी नेहमी
दोघे बुडू, दोघे तरू
३.
हा काळ नक्की कोणता
एकत्र वादळ शांतता
का धावतो इतके सतत
का येत नाही थांबता ?
ती लाट होती कोणती
आलो किनारी आयता
पावेल सर्वांना अशी
का एक नाही देवता ?
धरले म्हणूनच मौन तू
झाली हवीशी वाच्यता
आहोत कोठे नेमके
आरंभ की ही सांगता
तो भेटतो, पण शेवटी
मृत्यू असा का चाहता ?
काहीच नाही शक्यही
इतकीच आहे शक्यता
..............................................

No comments:
Post a Comment