तीन गझला : सुनील श्यामराव पोटे

 




१.


जे जुने त्यांची नव्यांनो काळजी घ्या

मायबापाची मुलांनो काळजी घ्या


पोर शिक्षेने कधी शिकणार नाही

हात इवलेसे छड्यांनो काळजी घ्या 


राज्य हाती जात आहे दानवांच्या

येथुनी पुढच्या पिढ्यांनो काळजी घ्या


बांधुनी बुरखा घरी येतील दुःखे

चार उरलेल्या सुखांनो काळजी घ्या 


देह काटेरी हवेचा होत आहे 

फूल होताना कळ्यांनो काळजी घ्या 


भूतकाळाला म्हणे देणार फाशी

गाडल्या गेल्या मढ्यांनो काळजी घ्या 


लोकशाही खोल पुरली जात आहे

कौल देताना मतांनो काळजी घ्या


२.


करू मुलींच्या जन्माचेही प्रचंड स्वागत 

चंद्र, सूर्य अन् तारे आणू वाजत-गाजत 


फक्त उजेडासवेच जाऊ तमास टाळू 

वाढवायची असेल जर का जगात किंमत 


विसरुन गेली लग्नानंतर कधीचीच ती 

आठवणींना उगाच बसला तो गोंजारत 


बेईमानी भर रस्त्याने धावत आहे 

इमानदारी जागोजागी आहे लोळत 


बजावून मी श्वासांनाही जरी ठेवले 

तू दिसल्यावर गती वाढते अगदी नकळत 


चोरभावना नेत्यांमधली मेल्यानंतर

सजेल अपुला सोन्याच्या वर्खाने भारत 


पुढे पुढे जग मीच एकटा उरलो मागे 

करशिल का तू गझले माझी तरिही सोबत


३.


निळसर पृथ्वी पडू लागली काळी आता

धोक्यामध्ये चराचरांची नाडी आता


टंचाईचे संकट आले डोक्यावरती

श्वासांनाही विकत घ्यायची पाळी आता


दिसतो बुटका, साधा, सोपा, सडपातळ पण

गझलेला मी देतो उंची जाडी आता


'मले-तुले' या शब्दांमध्ये अवीट गोडी 

नव्या रुपाने नटली माझी 'झाडी' आता


नव्या पिढीच्या संस्कारांची वाढ खुंटली 

केसांसोबत फक्त वाढते दाढी आता


"मनी वसू दे मैत्री, करुणा" सांगत फिरते

ताडोबाच्या वाघांची डरकाळी आता

.............................................

No comments:

Post a Comment