तीन गझला : मनाली प्रदीप कोनकर

 




१.


माणसांना मी अताशी बदलताना पाहिले 

रोज खोट्या मुखवट्यांना चढवताना पाहिले  


काळजाला हात जेव्हा घातला होता तिच्या 

मी तिला लोण्याप्रमाणे वितळताना पाहिले


कालपरवा फक्त ती संसार  सांभाळायची 

आज चंद्रावर तिला मी उतरताना पाहिले


दुःख सारे सौख्य नाही हास्य  बाकी तेवढे

जीवनाचे गणित त्याला जमवताना पाहिले


लेक झाली चांदणे जणु उतरलेसे वाटले 

मी घराला आज त्यांच्या उजळताना पाहिले


२.


नजर सख्या तुझी  अजून टाळते पुन्हा पुन्हा

अजून मी तशीच रोज लाजते पुन्हा पुन्हा


तुझ्याविना कशी तरू अफाट सागरात या

युगांयुगे तुझीच साथ मागते पुन्हा पुन्हा


तमात शोधते  दिशा कुठेच मार्ग ना दिसे

तिथे तुलाच  काजव्यात पाहते पुन्हा पुन्हा


तुझ्यात एकरूप मी जशी शिवात पार्वती

जणू तुझ्या नसानसात  वाहते पुन्हा पुन्हा


दिले मनास काळजास सर्व सर्व मी दिले

रिती रिती तरी भरून राहते पुन्हा पुन्हा


३.


त्या उन्हाचे चांदण्यांशी बोलणे झाले

अन्‌ उन्हाचे भर दुपारी  चांदणे झाले


मौन होते फार काही बोललो नाही

एकमेकांची मने सांभाळणे झाले


मी म्हणाले ते तसे ना मानले कोणी 

पश्चिमेला पूर्व माझे मानणे झाले 



मी किनारी लागले नाही सुखाच्या पण

जे मिळाले त्या ठिकाणी राहणे झाले 


ईश्वराला पाहिले मी माणसांमधे

हात आपोआप माझे जोडणे झाले

...............................

मनाली प्रदीप कोनकर,

 पेण 

मो. 8793655103

No comments:

Post a Comment