१.
प्रतारणा तव कळूनही
तुझीच रे मी अजूनही!
सरेल रे जन्म-दु:ख ते
विरेल का प्रीतधून ही?
उठून दिसतात रे चुका
समर्थने पांघरूनही
पवित्र श्रद्धेमुळेच हो
विटंबनांनी मिळूनही
अशी कशी प्रीत रे तुझी ?
सुगंध येतो सुकूनही
२.
रस्ता तुला दिसाया पुरता जळून गेलो
तेव्हा कुठे तुला मी थोडा कळून गेलो
नभ हे पहात होते चढती कमान माझी
तुझिया प्रतारणेने मी ढासळून गेलो!
मर्जी तुझी; रहा ना आजन्म कोरडी तू
हृदयातुनी तुझ्या मी हा उन्मळून गेलो...
दैवी कळ्याफुलांना स्वर्गात काय तोटा?
येथेच राहिलो मी; पण दरवळून गेलो...
मागेच स्वत्व माझे खाऊन दैव गेले
मी आंधळा रिकामे जगणे दळून गेलो
३.
चालली श्रद्धेत भेटीची तुझी ही आस भोळी
पूर्ततेची वाट काटेरी उभी अन् विघ्नटोळी
मी म्हणू प्रारब्ध हे की स्वाभिमानी जिद्द माझी ?
देव देतो सौख्य-सुविधा; फाटकी माझीच झोळी!
चालला गणवेश शाळेतून; चड्डी गोणपाटी
खोचला सदराच आईची म्हणोनी शुभ्र चोळी...
तू तव्यासम तापतो का त्या सुरक्षित भाषणांनी ?
भाजुनी घेतात तुजवर मतलबाची गोड पोळी !
जीवनाचा ग्रंथ पुरता छापता आलाच नाही
शेष मागे राहिल्या गझलेतल्या ह्या चार ओळी
...….......................................
हेमंत डांगे,
कोल्हापूर,
मो.९८८१०१३४१७

No comments:
Post a Comment