तीन गझला : अंजली दीक्षित-पंडित

 




१.


कुणासाठी कुणालाही सवड नाही

तुझ्या शहरात माझे मन रमत नाही 


कधी बिनचूक येते मौन ओघवते

पुढे बोलायचे काही उरत नाही


व्यवस्थेला तिने स्वीकारले नाही 

व्यवस्थाही तिला माझी म्हणत नाही 


बयो, एकाच वाक्याने शहाणी हो 

जसे दिसते तसे सहसा असत नाही


पुसुन डोळे खरोखर लख्ख झाली ती

दिखाव्याची तिला बिलकुल गरज नाही 


अवेळी दोर सारे कापले गेले 

अता परतायलाही मन करत नाही


तुझ्या गर्दीत भांबावून गेले मी

तुझी गाडी कशी पकडू कळत नाही!


२.


कुणावर रागही नाही कुणावर लोभही नाही 

जरी तुमच्यात दिसते मी तरी तुमच्यातही नाही


जराही शक्यता नाही तुझ्या दिंडीत येण्याची  

मुभा संसारव्यापातुन मला मिळणारही नाही 


कधी बानू, कधी मी म्हाळसा होते तुझ्यासाठी 

सततची धावपळ माझी तुला माहीतही नाही 


मलाही आठवण येते, कुठे नाही म्हणाले मी

जखम पहिल्याप्रमाणे मात्र ताजी होतही नाही


जशी कोलाहलाने आतल्या मी गोंधळुन जाते

तशी जाणीव होते मी स्वतःच्या आतही नाही 


निसटताना धडा देऊन जाते कोरडी वाळू

तुझ्या हातात असलेले तुझ्या हातातही नाही 


३.


जरी हळव्या मनाला लागल्या गोष्टी 

पटत नसल्या तरी स्वीकारल्या गोष्टी 


करू दे उत्खनन कोणी कितीदाही

उकरणे शक्य नाही आतल्या गोष्टी 


उठुन बसतात एकांतात रात्रीच्या 

निजवलेल्या तुझ्या-माझ्यातल्या गोष्टी 


जरासा वेळ आनंदात गेला पण

 पुढे कंटाळवाण्या वाटल्या गोष्टी 


दिवस आला तसा काठावरुन गेला

तिन्हीसांजेस काही लांबल्या गोष्टी 

.............................................

अंजली दीक्षित-पंडित, 

मोबा. ९८३४६७९५९६

1 comment: