१.
ती डोळ्यांनी बोलत आहे बहुधा
तो मानेने ऐकत आहे बहुधा
हे जग त्याला उलटे दिसते आहे
तो डोक्याने चालत आहे बहुधा
रोज तसे तो काहीबाही लिहितो
हल्ली तोही वाचत आहे बहुधा
फारच चर्चा त्याच्या डोक्याची बघ
तोही टोप्या घालत आहे बहुधा
लग्नाआधी फार दरारा होता
आता तो शरणागत आहे बहुधा
२.
दिसणार ना कधी मी ऐसा कयास होता
सूर्यास झाकण्याचा त्यांचा प्रयास होता
जिंकून घेतलेले त्याने इथे स्वत:ला
आता न अर्थ कुठल्या दिग्वीजयास होता
येतात वादळे अन् जातात वादळेही
भीती न धाक त्यांचा हिम-आलयास होता
हा जो निगूढ आत्मा आहे स्वयंप्रकाशी
त्याला कुणी न येथे उजळावयास होता
तू का उगाच खातो मांडे अहंपणाचे
हर मस्तवाल येथे गेला लयास होता
३.
गझले, तुझे जसे गुण रक्तात येत गेले
वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले
स्पर्शामधून जेव्हा पुलकीत रोम झाले
तेव्हा नको नको ते चित्तात येत गेले
आहेस देव तू पण चित्तास चोरणारा
अवगुण तुझे अघोरी भक्तात येत गेले
आधी महीस वाटे मेघात दोष आहे
तिजला जिवंत अनुभव हस्तात येत गेले
बोली कुणीच त्यांची लावायला न धजले
मी ठाकलो उभा मग स्वस्तात येत गेले
...............…..........................
No comments:
Post a Comment