तीन गझला : डॉ. पवन कोरडे

 



१.


चणचण, अडचण असते काही, मर्जी चालत नाही

किडनी विकुनी गरजू कोणी, वाडा बांधत नाही


फोननंबर हजार तरीही, ना कुठला उपयोगी 

फाशीच्या आधी बोलावे, हॅलो वाटत नाही


निष्पापाला बघून दहशत, स्फोट भयानक करते

चिंध्या-चिंध्या सगळे अवयव, अर्भक वाचत नाही


तुझ्या कुशीतच अथांग शांती, सुखरुप वाटे आई

मेघ गर्जना करो कितीही, पण मी दचकत नाही


एका घोटाने कोणाची, तहान भागे काहो ?

देताना का थोडीशीही, लज्जा वाटत नाही?


पुरोहिताच्या घरी पोचते, देवापाशी नाही

म्हणून कुठल्या मंदिरात मी, धन दान करत नाही


बालवयाच्या हातामधुनी, ते स्वेदाश्रू गळती 

वीटांचे तो वजन उचलतो, पुस्तक उचलत नाही


घोकंपट्टी केली त्याने, मेरीटमधे आला

मी झालो नापासच कारण, रट्टा मारत नाही


वादळामधे त्या एखादा, कलंडेल पर्वतही

पण मेरू अटळ निश्चयाचा, कधी कोसळत नाही


पश्चिमेस उगवेल सूर्य अन्, बुडेलही पूर्वेला 

पण मानव मानव होण्याची, शक्यता दिसत नाही


२.


बिनबुडाची बात करतो मूर्ख आहे का?

बे दुणे तो पाच म्हणतो मूर्ख आहे का?


बापआत्मा शांत ना जीतेपणी केला 

बाप मेला श्राद्ध करतो मूर्ख आहे का?


भौतिकी रसशास्त्रसम विज्ञान शिकवावे

अजुनही पोथ्या पढवतो मूर्ख आहे का?


गणपती दुध का पितो विज्ञान दडलेले

वाजवत तो टाळ बसतो मूर्ख आहे का?


देव अल्ला होत नाही खुश कधी ऐसे

तो बळी-बकरा चढवतो मूर्ख आहे का?


भरवसा तो अंध करतो भ्रष्ट नेत्यावर 

अन् गड्या तो भांड बनतो मूर्ख आहे का?


आडवी जाते तिथे मांजर जशी त्याला

घाबरत रस्ता बदलतो मूर्ख आहे का?


‌सूर्य हर दिवशीच उगवे भेद नाही रे 

यार तो शनिवार म्हणतो मूर्ख आहे का?


३.


आता अकड कशाला मेल्यावरी अकड

आता सडू नको तू कुजल्यावरीच सड


अर्थात जीवनाची ही चित्रकारिता

जगण्यात संयमाचा हलकाच ब्रश पकड


हा जन्म एक मिळतो प्रेमच करायला

येणार जो पुढे त्या जन्मात तू झगड


वस्तीत ह्या, वडाचे ना झाड एकही

वटपौर्णिमेस लावू आपणच एक वड


पडुनी उठावयाची रे वेगळी मजा

पण कोण तुज म्हणाला की नेहमीच पड


तो वर्ग दाबणारा दाबून पाहतो

पण तू दबायचे ना मुद्द्यावरीच अड


मोठी गरज इथे तर पैसाच वाटते

या पूर्ततेकरीता पैसाच तीव्र नड

......….….........................

No comments:

Post a Comment