तीन गझला : नारायण सोनवणे

 




१.


खरेपणाही कळणार शेवटी 

कुठे मुलामा दमदार शेवटी 


गळ्यात धोंडा पडला असा कसा 

पसंत होता सुकुमार शेवटी 


व्यथा निघाली हळवी चरायला 

उरात काटा सलणार शेवटी 


नकोच होती सलगी करायला 

खुशाल होतो व्यभिचार शेवटी 


अबोल चाफा फुलतो कसा तिथे 

तसा असावा गुलजार शेवटी


मिटून डोळे कळते कसे तिला 

अहा निघाला उदगार शेवटी


प्रगल्भ दृष्टी दिसते विशालता 

खुज्यास त्याचा अधिकार शेवटी


निरोप मित्रा तसला तुझा दिला 

मिळोत वैरी दिलदार शेवटी


मतामतांचे सरकार शेवटी

सुमार लावा अधिभार शेवटी 


२.


निवडणूक की रंगधुमाळी आली

खर्चायाला सत्ता काळी आली


कुणी म्हणाले बिगुल वाजला आहे

हातावर हातांची टाळी आली


स्वच्छ, पांढरे बगळे मैदानावर

काकधूळ काजळी कपाळी आली


पाणवठ्यावर झुंबड कसली आहे 

शेवटची पाऊस पहाळी आली


खडी, मुरुम, वाळूच्या व्यापाराला

कडे मनगटी, कानी बाळी आली


पसंत मुलगी म्हणून कळवा त्यांना 

लग्न उरकले तार निराळी आली 


माय मराठी अभंग गाण्यासाठी 

ओव्या ओठी बघ भूपाळी आली 


३.


जर इतका त्याचा रंग सावळा आहे

जमतो भवताली तरी घोळका आहे


का आठवणींचा जीव चालला आहे 

ज्याच्या हृदयाचे राज्य खालसा आहे 


बाळाला त्याची ओळख लागत नाही 

दाखवला ज्याने घुंगुरवाळा आहे 


ही पायपीट तू पहा विठ्ठला दिंडी 

ज्या भेटीसाठी जीव दंगला आहे 


तू आपुलकीने कुठे मिरवतो झेंडा? 

बळजबरी त्यांची तसा कायदा आहे 


पाण्यात राहुनी वैर करावे कोठे ?

माशाला कळते कुठे ऐक्यता आहे 


दोघांत देखणा कोण असावा नक्की 

हा तिचाच गोंधळ लग्नापुरता आहे


राधेला पडतो प्रश्न सारखा येथे 

कृष्णाचा नक्की कुठे घरोबा आहे?

................…..........................

नारायण सोनवणे

मो.९९७००६४३६६ 

No comments:

Post a Comment