१.
गाठ पक्की अंतरीची खोलणारा पाहिजे
माणसाला माणसाशी जोडणारा पाहिजे
वाट आहे लागली पण जात नाही जात ती
जात आता एकदाची सोडणारा पाहिजे
कष्ट सारे नष्ट व्हावे न्याय व्हावा हर घडी
शोषणाऱ्या माणसाला रोखणारा पाहिजे
ऐन तारुण्यात व्यसने बैसली डोक्यावरी
वाकडी ती वाट त्यांची टोकणारा पाहिजे
कापली जातात झाडे क्रूरतेने नेहमी
दाट हिरव्या जंगलांना राखणारा पाहिजे
डॉक्टरांना प्रश्न हा गर्भात खुडता का मुली
पाडणाऱ्या डॉक्टरांना सोलणारा पाहिजे
यंत्रणा ही भ्रष्ट खाल्ले कुंपणाने शेतही
त्याविरोधी युद्ध आता छेडणारा पाहिजे
लोकशाही वाचवा रे स्तंभ चौथा सांगतो
बोलणारे खूप झाले वागणारा पाहिजे
मोहनाला मोह नाही हे जरी असले खरे
एक साथी पण तरीही मोहणारा पाहिजे
२.
पुत्रास चांगले ते वागावयास सांगा
संस्कार छान तुमचे दावावयास सांगा
भरपूर वाचल्याने अंदाज येत नाही
हर एक माणसाला वाचावयास सांगा
ना चांगल्या गुणांना कवटाळले तरी पण
वाईट संगतीला सोडावयास सांगा
पर्याय तो श्रमाला दुसरा कुठेच नाही
हे सत्यही मुलाला समजावयास सांगा
येतील संकटे अन् नैराश्य खूप हृदयी
ध्येयास मात्र त्याला गाठावयास सांगा
कालास बाह्य झाल्या उपयोग ना तयांचा
साऱ्या अनिष्ट रूढी गाडावयास सांगा
असला जरी किती तो कामात व्यस्त भारी
आईस वेळ थोडा राखावयास सांगा
वापर म्हणा कितीही तू प्राणवायु हिरवा
तितकीच त्यास झाडे लावावयास सांगा
ना गर्व कर कशावर मिळते जरी प्रसिद्धी
ज्येष्ठांसमोर त्याला वाकावयास सांगा
सोडून द्वेष, मत्सर रागास घाल आवर
सर्वांस प्रेम माया वाटावयास सांगा
चिंता न काळजी ती राहील जन्मभरही
मनमोकळेपणाने हासावयास सांगा
श्रीमंत जाहला पैशाने बराच मोठा
त्याला तसेच साधे राहावयास सांगा
मोठा-लहान त्याने ना भेद तो करावा
सम्यक अशीच दृष्टी बाणावयास सांगा
गेले जरी पुढे जग हे आजचे कितीही
संपन्न वारशाला राखावयास सांगा
सांगू कसे तुला मी मोहन विचार माझे
त्याने दिलीत वचने पाळावयास सांगा
३.
वागवेना मायबापा त्या मुलाला काय सांगू
स्वार्थ भरलेल्या अघोरी माणसाला काय सांगू
गाय मेली खूर घासत माहिती नाही कुणाला
फक्त तिकडे धावणाऱ्या वासराला काय सांगू
वॄद्ध-आश्रम वाढला तो दोन संख्येने जरासा
दुःख झाले कोवळ्या त्या नातवाला काय सांगू
एकही इच्छा कधी ना पूर्ण केली लेकरांनी
दूर घिरट्या मारणाऱ्या कावळ्याला काय सांगू
राहिली ना पाखरे डोळ्या दिसत नाहीत कोठे
वाट त्यांची पाहणाऱ्या जोंधळ्याला काय सांगू
ट्रॅक्टराने नांगरत ते जात आता शेत आहे
शांत एका कोपऱ्यातिल कासऱ्याला काय सांगू
गर्भ होता तो मुलीचा आत पाहत कौतुकाने
त्या कळीला पाडणाऱ्या डॉक्टराला काय सांगू
लाडकी ती मायबापा कोवळी होती कळी पण
त्या कळीला शोषणाऱ्या राक्षसाला काय सांगू
खूप इच्छा ज्ञान घेण्याची तयाची खास होती
अंगठा त्या मागणाऱ्या शिक्षकाला काय सांगू
दूर गेली पाखरे घरटे सुने झाले कधीचे
शांत अश्रू ढाळणाऱ्या उंबऱ्याला काय सांगू
दोष पाहत राहतो मी फक्त दुसऱ्याचे कधीपण
दोष माझे झाकणाऱ्या मी स्वतःला काय सांगू
..............................................
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे
मो. 703827655

No comments:
Post a Comment